इर्विनमध्ये गोंधळ : उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोपअमरावती : गांधी आश्रम येथील शामराव किसन दिहाडे (४८) यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना इर्विन रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरवरच हलगर्जीपणाचा आरोप करून मारहाण केली व डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शहर कोतवाली पोलिसांकडे रेटली होती. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत हा गोंधळ सुरू असल्याने पोलीस बंदोबस्त लावला होता. गांधी आश्रम येथील शामराव दिहाडे यांची प्रकृती बिघडल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ इर्विनमध्ये आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी लवणकर यांनी शामराव दिहाडे यांची तपासणी केली असता ते मृतावस्थेत आढळले. दरम्यान नातेवाईकांनी डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांनी शामराव दिहाडे हे मृत असल्याचे सांगितले. मात्र, डॉक्टरने उपचार न केल्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. वैद्यकीय अधिकारी लवणकर यांना वेठीस धरून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ काही वेळात शहर कोतवालीचे ठाणेदारासह काही कर्मचाऱ्यांच्या ताफा इर्विनमध्ये पोहोचले. त्यांनी तणावग्रस्त स्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टरवर गुन्हा नोंदविण्याची मागणी नातेवाईकांनी केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिसांनी डॉक्टरांशी संवाद साधून सत्यस्थितीची माहिती घेऊन नातेवाईकांची समजूत काढली. मात्र नातेवाईकांचा हा गोंधळ रात्री उशिरापर्यंत सुरुच होता. रविवारी सकाळी पुन्हा शवविच्छेदनगृहासमोर नातेवाईकांनी गर्दी केली व शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे दुपारी उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
नातेवाइकांची डॉक्टरला मारहाण
By admin | Updated: July 31, 2016 23:59 IST