दु:खसागर : आईचा हंबरडा, उपस्थितांनाही झाले अश्रू अनावर अमरावती : रविवार १० जुलैला चांदूरबाजारात किशोर इंगळे यांच्या भाचीचा विवाह संपन्न झाला. जावई बाळासाहेब तायडे आणि बहीण ज्योती यांची मुलगी रश्मी हिच्या विवाहाची जबाबदारी किशोर यांनीच पेलली होती. वधूचा मामा म्हणून ते झाडून साऱ्या नातेवाईकांच्या स्मरणात राहिले. त्यामुळेच त्यांचा अपघाती मृत्यू या विवाह समारंभात सहभागी झालेल्यांच्या पचनी पडला नाही. काय! किशोरभाऊ गेलेत, अशी सर्वांची कारुण प्रतिक्रिया उमटली. वडील वारल्यानंतर किशोर इंगळे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. इंगळे बिछायत केंद्रापाठोपाठ त्यांनी मंगलकार्यालयाची मुहूर्तमेढ रोवली.आ.बच्चू कडू यांचे खंदे समर्थक ही त्यांची अन्य एक ओळख. चांदूरबाजारात शहरात त्यांनी अल्पावधीतच मोठे नाव कमावले. त्यांच्या दोन्ही बहिणी विवाहित आहेत. दोन्ही बहिणींचा हा एकुलता एक भाऊ असा अपघाती गेल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. खरवाडीनजिक बुधवारी झालेल्या भीषण अपघातात किशोर यांच्यासह त्यांची पत्नी व ३ वर्षीय चिमुरडा शौर्यचा एका बेधूंद ट्रकचालकाने बळी घेतला. बुधवारी रात्रीच या घटनेची माहिती अनेकांना मिळाली. काहींनी मग चांदूरबाजारात धाव घेतली तर अनेकांनी जवळच असलेल्या खरवाडीकडे धाव घेतली. दुसरीकडे या अपघाताचे वृत्त ठळकपणे छापून आल्याने गुरुवारी नातेवाईकांसह हजारोंनी किशोर इंगळे यांचे घर गाठले.मात्र आंदोलन आणि तणावपूर्ण परिस्थिीतीमुळे नातेवाईकांना तीनही पार्थिवांची प्रतिक्षा करावी लागली.सकाळपासून इंगळे यांच्यासह तीनही पार्थिवाची प्रतीक्षा करीत असतानाच त्यांचे नातेवाईकही गर्दीचा एक भाग बनले. किशोर यांच्या वंदना आणि ज्योती या दोन्ही बहिणी बुधवारीच रात्रीच त्या चांदूरबाजार येथे पोहचल्यात. एकुलता एकभाऊ, वहिनी आणि लहानग्या भाच्याचे पार्थिव पाहूण त्यांचा आक्रोश हेलावून सोडणारा होता. किशोर इंगळे यांचा मोठा मुलगा १० वर्षीय सुजल तर शुन्यात हरवला होता. आई-वडील व लहान भाऊ आता आपल्यात नसल्याची जाणीव त्याला झाली होती. किशोर इंगळे सुपरिचीत असल्याने नातेवाईकांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक यांच्या घराजवळ जमले होते. ट्रक चालकाच्या बेदरकारपणाचा बळी ठरलेल्या शौर्य महिनाभरापासून आजारी होता. रश्मी या आतेबहीणीच्या विवाहासाठी त्याला रूग्णालयातून काही वेळा पुरते आणण्यात आले होते. तीन वर्षांचा हा चिमुरडा बरा होत असताना आई, बाबा सोबत तोही अनियंत्रित वाहतुकीचा बळी ठरला. शौर्यचे छोटेसे पार्थिव पाहतांना अनेकांचे डोळे पाणावले. किशोर आणि शिल्पा यांच्या तुलनेत शौर्यचे निर्जीव पार्थिव पाहून अनेकांना हुंदका आवरता आला नाही.
नातेवाईकांचा विश्वासच बसेना !
By admin | Updated: July 22, 2016 00:12 IST