समारोप : विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांचे प्रतिपादन अमरावती : महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस विभागाने केलेल्या विविध उपक्रमांमधून नागरिकांमध्ये पोलिसाविषयी आपुलकी निर्माण होते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी वसंत हॉल येथील 'रेझिंग डे'च्या समारोपीय कार्यक्रमात केले. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस विभागाने २ ते ८ जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पोलीस व नागरिकांमध्ये संवाद साधून एकोपा निर्माण करणे व जनजागृती करणे या उद्देशाने हे उपक्रम पोलीस विभागाने राबविले आहे. यादरम्यान पोलीस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शहर वाहतूक शाखा, सायबर सेल, बिनतारी संदेश बॉम्ब शोधक व नाशक पथक, महिला सेल तसेच न्यायवैद्यक विज्ञान शाखेचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलच्या माध्यमातून भेटी देणाऱ्यांना माहिती देण्यात आली. तब्बल ४ हजार विद्यार्थी व १ हजार नागरिकांनी पोलीस प्रदर्शनीला भेटी दिल्या आहेत. शुक्रवारी रेझिंग डेच्या समारोपीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक विजय ठाकरे, पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे आणि मोरेश्वर आत्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.
'रेझिंग डे'च्या उपक्रमांमुळे निर्माण होते पोलिसांविषयी आपुलकी
By admin | Updated: January 9, 2016 00:28 IST