फोटो पी १० कोरोना
परतवाडा : कोरोनाच्या अनुषंगाने अचलपुरात दाखल झालेल्या केंद्रीय समितीसमोरच डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यास आरोग्य यंत्रणेकडून नकार दिला गेला. एवढ्यावरच ती यंत्रणा थांबली नाही, तर एका आरोग्य अधिकाऱ्याने सुरक्षा गार्ड आणि कर्मचारी पाठवून त्या नागरिकास तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
पथक दाखल होताच त्या पथकासमोर त्या नागरिकाने आपली व्यथा मांडली. झालेला प्रकारही पथकासमोर मांडला. पथकातील सदस्यांनी तो प्रकार समजूनही घेतला. अचलपूर तालुक्यातील सालेपूर पांढरी येथील रहिवासी आणि अचलपूर बाजार समितीचे माजी संचालक रवींद्र सालेपूरकर यांच्यावर ९ एप्रिलला हा प्रसंग ओढवला. त्यांना २६ वर्षीय मुलाची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी करून घ्यायची होती. याकरिता त्यांनी खासगी प्रयोगशाळेकडे धाव घेतली. पण, त्यांना नकार मिळाला. यानंतर ते मुलासह अचलपूर डेडिकेटेड कोविड रुग्णालयात पोहोचले. येथे रॅपिड ॲन्टिजेन चाचणी उपलब्ध नसल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. त्यांना व त्याच सुमारास आलेल्या एका परीक्षार्थी मुलीलाही परतविले गेले. याच सुमारास जिल्हा आरोग्य यंत्रणेसह केंद्रीय पथक कोविड रुग्णालयात दाखल झाले. तेथे उपस्थित रवींद्र पाटलांनी केंद्रीय पथकासमोर काही बोलू नये, आपली पोल खोलू नये म्हणून तेथून त्यांना निघून जाण्यास गार्ड आणि कर्मचाऱ्यांकरवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचविले. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
दरम्यान, रात्रीतून उभरल्या गेलेल्या पांढऱ्या शुभ्र मंडपात केंद्रीय पथक दाखल होताच रवींद्र पाटील यांनी आपबीती सांगितली. केंद्रीय पथकानेही रवींद्र पाटील व त्यांचा मुलगा ऋषभ यांच्याशी संवाद साधला. यानंतर त्याच ठिकाणी रॅपिड ॲन्टिजेन किट उपलब्ध झाली आणि आरोग्य यंत्रणेने ऋषभची रॅपिड ॲन्टिजेन चाचणी घेतली.