विभागीय आयुक्तांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, ७० नगरसेवकांकडून होणार वसुली
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या जबाबदार पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपयांची वसूलपात्र रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
विभागीय आयुक्तांनी आपल्या १५ फेब्रुवारी २०१९ च्या आदेशान्वये तत्कालीन जबाबदार ७२ पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही वसुली निश्चित केली आहे. विभागीय आयुक्तांच्या या आदेशान्वये जिल्हाधिकारी अमरावती यांनी १८ डिसेंबर २०२०च्या पत्रान्वये, अचलपूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना ती वसूलपात्र रक्कम त्वरित वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांवर मुख्याधिकाऱ्यांना २४ डिसेंबरच्या बैठकीत अहवाल सादर करावयाचा होता. पण, अद्यापपावेतो यातील वसूलपात्र रकमेचा कुणीही भरणा केलेला नाही. यावर मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषदेच्या विभाप्रमुखांची २९ डिसेंबरला बैठक घेऊन आवश्यक निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र नगर परिषद लेखा संहिता १९७१ चे कलम १७४ मधील तरतुदीनुसार सन २००२-२००३ च्या लेखापरीक्षणात तत्कालीन, नगरसेवक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, लेखापाल, कनिष्ठ अभियंता, नगरअभियंता विभागप्रमुख अशा एकूण ७५ लोकांवर ७ लाख ३१ हजार ९८८ रुपयांची वसुली काढली आहे. २००२-२००३, २००४-०५, लेखापरीक्षण वर्षातील ही वसुली आहे. आरोग्य विभागांतर्गत कचरा उचलणे, अनियमितता, वित्त आयोग बांधकामाकरिता तांत्रिक मंजुरी न घेता कामे करणे, रस्ता निधी व नगर परिषद निधीतील अनियमितता, दलितवस्ती सुधार योजना बांधकाम अनियमिततेच्या अनुषंगाने ही वसुली आहे. यातील तत्कालीन नगरअभियंता विभागप्रमुख विजय शर्मा यांच्या मृत्यूमुळे त्यांना वसूलपात्र यादीतून त्यांच्याकडील १ लाख ५१ हजार ८९९ रुपये वसूलपात्र रकमेसह वगळण्यात आले आहे. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना निवृत्त होऊन चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्यामुळे घटनेस जबाबदार धरता येत नाही. म्हणून या मुख्याधिकाऱ्यांचे नावही त्यांच्याकडील ७ हजार ६८० रुपये वसूलपात्र रकमेसह वसूलपात्र यादीतून वगळण्यात आले आहे. तत्कालीन अन्य एका मुख्याधिकाऱ्यांना प्राथमिक जबाबदारीतून खारीज करण्यात आले आहे. त्यांना जबाबदारीतून वगळल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष, लेखापाल, कनिष्ठ अभियंता व ६८ नगरसेवक सदस्य मिळून एकूण ७२ लोकांवर ५ लाख ७२ हजार ४११ रुपये ५० पैशाची वसुली विभागीय आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद केली आहे. यात अध्यक्षांसह ३८ नगरसेवकांकडून प्रत्येकी ५ हजार २३२ रुपये, उपाध्यक्षांवर ७ हजार ६८० रुपये, १४ नगरसेवकांवर प्रत्येकी २ हजार ४४७ रुपये ५० पैसे, १० नगसेवकांवर प्रत्येकी १ हजार ५८२ रुपये, सहा नगरसेवकांवर प्रत्येकी ८३५ रुपये ५० पैसे, एका नगरसेवकावर ६ हजार ८१४ रुपये, तर लेखापाल आणि कनिष्ठ अभियंत्याविरुद्ध प्रत्येकी १ लाख ५१ हजार ८९८ रुपये वसुली ठोठावण्यात आली आहे. यातील लेखापाल या वसुलीविरुद्ध न्यायालयात गेले आहेत. त्यांच्या वसुलीवर न्यायालयाचा स्थगनादेश असून त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
कोट
नगर परिषदेच्या ७२ पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून ५ लाख ७२ हजार ४११ रुपये वसूल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे १८ डिसेंबर २०२० चे निर्देश आहेत. २४ डिसेंबर २०२० ला अहवाल सादर करावयाचा होता. निर्देशानुसार वसूलपात्र रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे..
-राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, नगर परिषद, अचलपूर