अमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमालीचा माघारला आहे. कोरोना काळात पहिल्यांदा सर्वात कमी एक टक्का पॉझिटिव्हिटीची मंगळवारी नोंद झालेली आहे. याशिवाय संक्रमणमुक्तीचे प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात बुधवारपासून अनलॉक करण्यात आले. यात सर्वाधिक वाटा जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटीचा ठरला आहे. एप्रिल महिन्यात ५६ टक्क्यांवर गेलेली पॉझिटिव्हिटीने जिल्हा प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळविले होते. अखेर सामूहिक प्रयत्नांनी यावर मात करण्यात यश आले आहे. मंगळवारी नोंद झालेली ४५ पॉझिटिव्हची संख्याची संख्या ही दुसऱ्या लाटेच्या चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे.
कॉन्टक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट, पथकांचा सर्व्हे, होम आयसोलेशन रुग्णांवर ‘वॉच‘ याशिवाय पंचसूत्रीचा वापर आदी सर्व अस्त्र प्रभावी ठरल्यानेच तब्बल चार महिन्यानंतर कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आालेली आहे. क्षणभर आरोग्य यत्रंणा विसावत नाही तोच तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची पूर्व तयारी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाद्वारा सुरु करण्यात आलेली आहे.
पाईंटर
दिनांक चाचण्या पॉझिटिव्हिटी (टक्के)
१० जून ६,२९६ २.००
११ जून ६,७५४ १.५८
१२ जून ६,०८० १.६७
१३ जून ५,००२ २.०१
१४ जून ३,७३१ २.४१
१५ जून ४,२७३ १.०५
बॉक्स
संक्रमणमुक्तीचा दर उच्चांकी ९७ टक्के
जिल्ह्यात कोरोना उपचारातून बरे झाल्याचे प्रमाण सध्या ९६.७५ टक्के आहे. दुसऱ्या लाटेत संक्रमितांची संख्यावाढ झाल्यानंतर संक्रमणमुक्तांचे प्रमाण ८५ टक्क्यांपर्यंत खाली आले होते. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आठ हजारांपर्यंत पोहोचल्यामुळे डिस्चार्जच्या प्रमाणात कमी आलेली होती. त्यानंतर संसर्ग माघारल्यानंतर पुन्हा संकेमुणमुक्तांचे प्रमाण वाढले आहे.
बॉक्स
‘डबलिंग रेट’ १२४ दिवसांवर
दुसऱ्या लाटेत रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर आल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, जसा संसर्ग कमी झाला तसतसे हे प्रमाण वाढायला लागल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत गेला. सद्यस्थितीत ‘डबलिंग रेट’ १२४ दिवसांवर पोहोचल्याने जिल्हावासीयांचा जीव भांड्यात पडला आहे. याद्वारे जिल्हा प्रशासनाला उपाययोजना राबविताना मदत होणार आहे.