शिवजयंतीचा उपक्रम : ६०० विद्यार्थी झाले होते शिवाजीअमरावती : स्थानिक अभ्यासा इंग्लिश स्कूलच्यावतीने मागील वर्षी म्हणजे १९ मार्च २०१५ रोजी शिवजयंतीनिमित्त आयोजित उपक्रमाची 'लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड'समध्ये नोंद करण्यात आली आहे. या शाळेतील तब्बल ५९४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या दिवशी बालशिवाजींची वेशभूषा साकारली होती.अभ्यासा स्कूलच्यावतीने आयोजित हा उपक्रम शहरात चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जिवनातील काही महत्त्वपूर्ण क्षणांचे सादरीकरणही केले होते. एक तासाच्या या उपक्रमात पालकांचाही लक्षणीय सहभाग होता. त्याचप्रमाणे ७३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दोन वयोगटातील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. पहिल्या गटात ० ते १२ वर्षे तर दुसऱ्या गटात १३ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. अभ्यासा स्कूलच्या या आगळ्या उपक्रमाला जिल्हाधिकारी किरण गित्ते, तत्कालीन महापालिका आयुक्त अरूण डोंगरे, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक दिनेशकुमार त्यागी, अप्पर वर्धा प्रकल्पाचे अविनाश कोथडे, प्रवीण सोळंके आदींनी भेट देऊन विद्यार्थ्यांसह शाळा व्यवस्थापनाचे कौतुक केले होते. लिम्का बुक आॅफ रेकॉर्डसमध्ये नोंद झाल्याबद्दल शाळेचे कौतुक होत आहे.
‘अभ्यासा’च्या बाल शिवाजींची 'लिम्का रेकॉर्ड’मध्ये नोंद
By admin | Updated: March 18, 2016 00:24 IST