आयुक्तांची शिष्टाई : जागेच्या वादावर तोडगा; सहा सदस्यीय समन्वय समितीचे गठनअमरावती : येथील प्राचीन अंबादेवी, एकवीरादेवी मंदिराच्या बांधकामांची तपासणी आटोपताच गुरुवारी या दोन्ही मंदिरांच्या विश्वस्तांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत रस्त्यासाठी जागा सोडण्याच्या वादावरुन दोन्ही मंदिराच्या विश्वस्तांमध्ये वाद झाल्याची बाब पुढे आली आहे. मात्र या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी सहा सदस्यीय समितीचे गठन करण्यावर विश्वस्तांमध्ये एकमत झाले.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी या दोन्ही मंदिरांच्या विश्वस्तांमध्ये समेट घडवून आणण्याची कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र आयुक्तांनी अंबादेवी, एकवीरादेवी मंदिराचे बांधकाम मोजून विश्वस्तांची ‘फिल्डिंग’ लावण्याची कामगिरी बुधवारी बजावली. आयुक्तांच्या या निर्णयामुळे विश्वस्तांची भंबेरी उडाली. अखेर महापालिका प्रशासनाच्या निर्णयानुसार गुरुवारी दोन्ही मंदिरांच्या विश्वस्तांची बैठक घेण्यात आली. आयुक्त गुडेवार यांनी दोन्ही मंदिरांच्या विश्वस्तांना समजावून सांगताना वाद शमत नसेल तर तसे न्यायालयाला कळविले जाईल. गरज पडल्यास कायदेशीर कारवाईचाही सामना करावा लागेल, असा इशारा दिला. रस्त्याच्या जागेचा वाद असेल तर तो तोडगा काढण्यासाठी दोन्ही मंदिरांच्या विश्वस्तांना पुढाकार घेण्याचा सूचक सल्लाही त्यांनी दिला. त्यानुसार याविषयावर तोडगा काढण्यासाठी मंदिरांच्या विश्वस्तांमध्ये सहा सदस्यीय समन्वय समिती गठित करण्याचे ठरविले आहे. ही समिती आयुक्तांना अहवाल सादर करेल. या समितीचा निर्णय विश्वस्तांना मान्य राहील, असे एकमताने ठरविण्यात आले.या बैठकीला रमेशपंत गोडबोले, मीना पाठक, प्रदीप शिंगारे, अतुल आळशी, विद्या देशपांडे, शेखर भोंदू, सुधाकर पाठक, दीपक श्रीमाळी आदी विश्वस्त उपस्थित होते.समन्वय समितीत या सदस्यांचा समावेशअंबादेवी, एकवीरादेवी मंदिर संस्थानच्या विश्वस्तांमध्ये सुरू झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी सहा सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत अंबादेवी मंदिर संस्थानतर्फे शैलेश पोतदार, दीपक श्रीमाळी, प्रदीप शिंगोरे तर एकवीरादेवी मंदिर संस्थानतर्फे शेखर भोंदू, परीक्षित गणोरकर, राजेंद्र टेंबे यांचा समावेश राहील.
अंबा, एकवीरादेवी मंदिरांच्या विश्वस्तांमध्ये समेट
By admin | Updated: August 7, 2015 00:22 IST