अमरावती : आठ दिवसाच्या खंडानंतर सोमवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी ८९ पैकी चारच महसूल मंडळात दमदार पाऊस पडला जिल्ह्यात सरासरी १५.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. पेरणीसाठी किमान ९० मि.मी. पावसाची गरज असल्याने ज्या तालुक्यात एवढा पाऊस नाही, तिथे पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करावी व जिथे सरासरी पार झाली तेथे पेरणी करण्यास हरकत नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.जिल्ह्यात १ ते २८ जून या कालावधीत सरासरी १३६.२६ मिमी पाऊस पडायला पाहिजे, परंतू सद्यास्थितीत जिल्ह्यात फक्त ११३.७० मिमी पाऊस पडला आहे. तिवसा, दर्यापूर, अंजनगाव या तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यात खरिपाचे पेरणीने वेग घेतला आहे. व आठवडाभरात पेरण्या पूर्ण होतील, अशी माहिती कृषी विभागाने दिली. उर्वरीत ११ तालुक्यात मात्र, अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. त्यामुळे जमिनीत पुरेशी ओल नाही व उष्णता कायम आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी अजून पावसाची प्रतीक्षा करावी, अन्यथा दूबार पेरणीचे संकट येऊ शकते. जिल्ह्यात यंदा ७ लाख १४ हजार ९५० हेक्टरमध्ये खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. यामध्ये सोयाबीनसाठी २ लाख ८० हजार क्षेत्र प्रस्तावित आहे. कापूस २ लाख १५ हजार ५००, तूर १ लाख २० हजार, मुग ३५ हजार, ज्वारी ३० हजार, उडीद १२ हजार ५००, धान ८ हजार ४५०, व इतर पिकांसाठी १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्ताविक आहे. मागील आठवड्यापर्यत जिल्ह्यात १४ हजार ५०० क्षेत्रात पेरणी झालेली होती ही केवळ २ टक्केवारी आहे. सद्या स्थितीत २० हजार हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली आहे.
पेरणीसाठी हवाय दमदार पाऊस, कृषी विभागाचा सल्ला
By admin | Updated: June 30, 2016 00:04 IST