अचलपूर : अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने सर्वसमान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. वारंवार फसवणुकीची वेळ लाभार्थ्यांंंवर येत असून याकडे तहसीलदार व पुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
स्वस्त धान्य दुकानांचा परवाना मिळाल्यानंतर दुकानाच्या दर्शनी भागावर शिधापत्रिकाधारकांना दिसेल अशा जागेवर दुकानाच्या नावाचा फलक लावणे बंधनकारकर आहे. या फलकाचा आकार ४५ बाय ६0 सेंटीमिटर असावा, पांढर्या रंगावर लाल रंगाने परवानाधारकाचे नाव, परवाना क्रमांक व गाव स्पष्टपणे नमूद असावे. दुकानात किती धान्य, साखर, केरोसिनच्या शिल्लक साठय़ासंबंधी स्टॉक बोर्डही अनिवार्य करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे धान्य व वस्तूंचे भाव दर्शविणारा फलक लावणेसुद्ध आवश्यक आहे.
दुकानाची वेळ, सुटीचा दिवस आदींची माहितीदेखील येथील फलकावर स्पष्टपणे नोंदवलेली असावी. तसेच दुकानातील साठय़ाची नोंदवही अद्ययावत असावी, असे शासनाचे निर्देश आहेत. याबाबत काटेकोर नियम असूनदेखील या नियमांची अंमलबजावणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून अजिबात होताना दिसत नाही. याकडे पुरवठा अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्याने दुकानदारांकडून एक प्रकारे नागरिकांची व शासनाची फसवणूक होत असल्याचा प्रकार शहरात दिसून येतो.
याबाबत सविस्तर चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाईची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)