चांदूर बाजार : राज्यात रासायनिक खतांच्या किमतीत झालेल्या भरमसाठ वाढीने शेतकरी वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी आता हेक्टरी सोळाशे रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
जिल्ह्यात उन्हाळी हंगामात भाजीपाला, गहू, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पिकांच्या वाढीसाठी संयुक्त खतांची मात्रा दिली जाते. मात्र, आता रासायनिक खताच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. प्रत्येक खताच्या किमती सरासरी दोनशे ते अडीचशे रुपये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही पिकासाठी हेक्टरी आठ बॅग रासायनिक खताची गरज असते. आता झालेल्या पिकाचा दरवाढीने हेक्टरी १६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पेट्रोल, डिझेल दरवाढीसोबतच रासायनिक खतांच्या वाढीचा ही मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. विकलेल्या पिकाचे पैसेही वेळेत मिळत नाही. हाती आलेली रक्कम मेहनतीच्या मानाने अतिशय तुटपुंजी असते. त्यातच डिझेल आणि खतांची दरवाढ शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत टाकणारी ठरू शकते.
बॉक्स
शेणखत मिळणे दुरापास्त
पूर्वी शेतकरी आपल्या शेतात शेणखताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत होते. परंतु, अलीकडे शेणखात मिळणे कठीण झाल्याने सर्वच शेतकरी रासायनिक खत खरेदी करून शेतात टाकतात. पिकाला योग्य अशी खताची मात्रा दिली नाही, तर अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे रासायनिक खतांचे दर गगनाला भिडत असतानाही नाइलाजास्तव शेतकऱ्यांना पिकांकरिता ते खरेदी करणे भाग आहे.
बॉक्स २
शेतकऱ्यांना इंधनाचा दरवाढीचा फटका
डिझेलचे दर दररोज वाढत असल्याने मशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. पूर्वी ट्रॅक्टरच्या मशागतीचे दर प्रतितास सहाशे रुपये होते. परंतु, आता ८०० रुपये प्रतितास झाले आहेत. एका एकराला नांगरणीसाठी साडेतीन तास ट्रॅक्टर चालवावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता पुन्हा बैलांच्या साह्याने मशागत करावी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.