ब्राम्हणवाडा थडी : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४६ वर्षीय विवाहितेचे तिच्या मुलासह अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना ४ ते ८ एप्रिल दरम्यान घडली. याप्रकरणी ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आरोपी तुलसी पंजाबराव पडोळे (२५, रा. अंबाडा, ता. मोर्शी) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७६, ३७६ (२) (एन), ३६३, ३६६, ३२६ अन्वये गुन्हा दाखल केला.
पीडिता ही ४ एप्रिल रोजी तिच्या मुलाला दवाखान्यात घेऊन ब्राम्हणवाडा थडी येथे आली. उपचार करून गावी परत जाण्यासाठी कोणतेही वाहन नसल्याने तिने दुचाकीस्वार आरोपीला हात दाखवून थांबविले. सोबत जात असताना आरोपीने तिची विचारणा करून तिच्याबद्दल कळवळ व्यक्त केली. लग्न करून तुझ्यासह तुझ्या मुलांचा सांभाळ करतो, अशी बतावणी करून आरोपी तिला मध्यप्रदेशातील एका गावात घेऊन गेला. तेथे वेगळी भाड्याची खोली करून तिच्याशी शारीरिक कुकर्म केले.
दरम्यान, ८ एप्रिल रोजी आरोपी तुलसी पडोळे हा पीडिता व तिच्या दोन वर्षीय चिमुकल्यासह दुचाकीवरून निघाला. वणी गावाजवळ आरोपीने दोन्ही मायलेकांना दुचाकीवरून ढकलले. यात तिच्यासह तिचा चिमुकला गंभीर जखमी झाला. तिने कसेबसे ब्राम्हणवाडा थडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. ती व तिचा चिमुकला सध्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. तेथेच ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी तिचे बयान नोंदविले. पोलिसांनी ९ एप्रिल रोजी रात्री ११.४९ मिनिटांच्या सुमारास आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आरोपीच्या मुसक्या आवळल्या
आरोपीने पीडिताला खोटे नाव सांगितले. त्यानुसार जिल्हा सामान्य रुग्णालयात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांना बयान देताना पीडिताने आरोपीने नाव अमोल आठवले असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी अंबाडासह लगतच्या सात ते आठ गावांमध्ये अमोल आठवलेचा शोध घेतला. यादरम्यान आरोपीने पीडिताला ज्या ठिकाणी चहा पाजला होता, त्या व अन्य ठिकाणे पोलिसांनी पीडिताला दाखविले. त्याआधारे पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला अंबाडा परिसरातून अटक करण्यात आली. त्याला महिलेने ओळखलेदेखील. ब्राम्हणवाडा पोलिसांनी त्याला अटक करून शनिवारी न्यायालयात उपस्थित केले असता, न्यायाधीशांनी त्याला १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
-----------------