पत्रपरिषद : आनंदराव अडसुळांचा पलटवार अमरावती : आ. रवि राणा यांनी जमीन व्यवहारातून भ्रष्टाचार केला असून त्याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याची माहिती खा. आनंदराव अडसूळ यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून दिली. दोन दिवसांपूर्वी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आ. रवि राणांचे बडनेरातील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर खा. अडसुळांनी पत्रपरिषद घेऊन आ. राणांचा प्रसिद्धीसाठीचा खटाटोप असल्याचा आरोप केला. खा. अडसुळांच्या मते, युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी जात विचारुन महिलेला मारहाण किंवा धक्का दिला नसेल. पोलिसांनी अॅट्रासिटी गुन्हे दाखल करताना सीसीटीव्हीचे फुटेज तपासणे आवश्यक होते. मात्र, बडनेराचे ठाणेदार दिलीप पाटील राणांच्या दबावात असून त्यांनी कोणतीही तपासणी अथवा शहानिशा न करता कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप असला तरी जात विचारुन मारहाण केली जाते काय, असा सवाल अडसुळांनी उपस्थित केला. मी स्वत: अनुसूचित जातीचा असून माझे कार्यकर्ते मागासवर्गिय महिलेला शिवीगाळ करुन मारहाण करणार नाहीत, असा दावा त्यांनी के ला. आ. राणांनी सेनेला आव्हान देणारी भाषा वापरल्याने कार्यकर्त्यांनी उद्रेक केला. त्यामुळे कार्यालयाची तोडफोड केली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. आ. राणांच्या कार्यालयाची तोडफोड झाली तर अॅट्रासिटीचा प्रश्न कु ठे येतो, राणांनी केलेला हाप्रकार म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करणारा आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर दाखल केलेले अॅट्रासिटीचे गुन्हे मागे घेतले नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरणार, असा ईशारा अडसुळांनी दिला. मुख्यमंत्री गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पोलिसांनी शिवसैनिकांवर दाखल केलेल्या अॅट्रासिटीबाबत त्यांना वस्तुस्थिती कळविली जाईल, असे अडसूळ म्हणाले. राणांनी राजकारणाचा फायदा घेऊन सरकारी जमिनी हडपल्यात. त्याचे पुरावे उपलब्ध असल्याचेही अडसुळांनी सांगितले. महसूल विभागाच्या जमिनीत भ्रष्टाचार करताना राणांनी राजकारणाचा कसा वापर केला, हे जाणून घेतले तर मोठी पोलखोल होईल, असे ते म्हणाले. नरखेड रेल्वे पुलाचे उद्घाटन राणांनी कशाच्या आधारे केले, हे माहित नाही. मात्र राणांकडे नैतिकता आहे काय, असा सवाल अडसुळांनी यावेळी उपस्थित केला. शिवसेनेची परंपरा जशास तसे उत्तर देण्याची असल्यामुळे राणांना उत्तर देण्यात आले, हीबाब अडसुळांनी स्पष्ट केली. पत्रपरिषदेला माजी आ. संजय बंड, प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, सुनील खराटे आदी उपस्थित होते. शेतकरी हितासाठी राज्यभरात मोर्चे शिवसेना व आ.बच्चू कडू यांच्या प्रहारच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचा हितासाठी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचे नियोजन होते. तसा प्रस्तावही आ. कडू यांनी दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी मोर्चा काढण्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली. मात्र,ही समस्या राज्यभराची असल्याने राज्यस्तरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. ४ जानेवारी रोजी मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आल्याची माहिती खा. अडसुळांनी दिली.
राणा भ्रष्टाचारी, पुरावे उपलब्ध
By admin | Updated: December 29, 2016 01:46 IST