गल्ली क्रिकेट, लाठीकाठी : इर्विन ते गर्ल्स हायस्कूल मार्गावर रंगतअमरावती : ‘रूटीन’च्या जरा पलीकडे जाऊन थोडा वेळ मनासारखे जगण्याची संधी आबालवृद्धांना मिळण्याच्या उद्देशाने ‘लोकमत’द्वारे इर्विन चौक ते गर्ल्स हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर रविवारी आयोजित ‘धम्माल गल्ली’ कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे यावेळीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पहाटे साडेसहा वाजता इर्विन चौकात ‘धम्माल गल्ली’ला सुरूवात झाली. बच्चे कंपनी आजी-आजोबा आणि आई-बाबांचा हात धरून आधीच इर्विन चौकात पोहोचली होती. यावेळी गल्ली क्रिकेटने कार्यक्रमात रंगत आणली. घरूनच आणलेली बॅट, बॉल आणि स्टम्प घेऊन जागा मिळेल तेथे चौकार, षटकारांची बरसात सुरू झाली. मध्येच स्केटिंग ग्रुपचे जल्लोषात आगमन झाले. उत्साही तरूण स्केटिंगची प्रात्यक्षिके दाखवित इकडे-तिकडे पळत होते. ‘रोप स्किपिंग’च्या प्रात्यक्षिकांनी यावेळी दर्शकांना खिळवून ठेवले. महिलांनी आपल्या परीने कार्यक्रमाची रंगत वाढविली आणि आनंद लुटला. टिक्कर, दोरीवरच्या उड्या, बेधूंद नृत्यावर धरलेला ताल यामुळे कार्यक्रम चांगलाच बहरला. हनवटीवर मोठा बांबू तोलून धरण्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक यावेळच्या ‘धम्माल गल्ली’चे वैशिष्ट्य ठरले. चिमुकल्या मुलींनी निगुतीने थाटलेला भातुकलीचा खेळ आकर्षणाचे केंद्र ठरला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळांडूंनी सादर केलेले लाठीकाठी आणि थांग-ता चे प्रात्यक्षिक आकर्षणाचे केंद्र ठरले. यावेळी भर रस्त्यावर कॅरमचा डावही रंगला. (प्रतिनिधी)
‘धम्माल गल्ली’त रमले अमरावतीकर
By admin | Updated: May 4, 2015 00:21 IST