गावकरी आक्रमक : निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना हवाय न्यायदर्यापूर : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या तक्रारी दूर कराव्यात, या मागणीसाठी नजीकच्या सामदा कासमपूर येथील ग्रामस्थांनी बुधवारी स्थानिक पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. संजय गांधी निराधार योजनेच्या येथील लाभार्थ्यांकडून माधव देवराव चोरपगार नामक इसम महिन्याकाठी २०० रूपयांची वसुली करीत असल्याबद्दल व शासनाच्या कामकाजात अडथळा निर्माण करीत असल्याबद्दल लाभार्थ्यांनी मोर्चाच्या माध्यमातून तहसील व पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. यावेळी सरपंच प्रशांत तराळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोहर तराळ, पोलीस पाटील सुरेंद्र तराळ, बाळू धाडगे, प्रल्हाद कळस्कर, विजय चोरपगार व गावातील महिला आणि २०० ते २५० नागरिक उपस्थित होते. त्यांनी आ. रमेश बुंदिले, तहसीलदार राहूल तायडे यांना निवेदन देऊन मागणी केली.परिसरातील अनेक नागरिक शासनाच्या निराधार योजनांचा लाभ घेतात. त्यातल्या त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक आहे. परंतु या लाभार्थ्यांच्या अनुदानाबाबतच्या अनेक तक्रारी आहेत. अनेकदा तर पात्र लाभार्थी असूनही त्यांची प्रकरणे मंजूर केली नाहीत. शिवाय मंजूर प्रकरणांचे अनुदानही महिनोन्महिने मिळत नाहीत. त्यामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत. लाभार्थ्यांच्या या अडचणीचा फायद माधव देवराव चोरपगार नामक इसम घेत असल्याचे लाभार्थ्यांनी संबंधितांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. प्रकरण मंजूर करून देणे, अनुदान तातडीने मिळवून देणे आदी कारणे सांगून सदर इसम लाभार्थ्यांकडून प्रतीमहिना २०० रूपये वसूल करीत असल्याचे त्रस्त लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. सदर इसमावर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी मोर्चाच्या माध्यमातून आमदार रमेश बुंदिले व तहसीलदार राहुल तायडे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले. निराधार नागरिकांचे जीणे सुकर व्हावे, यासाठी शासनाद्वारे निराधार योजना चालविल्या जातात. या योजनेचा आजमितीस अनेक लाभार्थी लाभ घेत आहेत. मात्र, योजनेतील अनियमिततेमुळे लाभार्थ्यांना बरेचदा त्रास सहन करावा लागतो. यासाठी शासनाने स्थानिक स्तरावर तातडीने उपायोयजना करून हप्तेवारी पैसे वसूल करणाऱ्यांवर अंकुश लावावा, अशी मागणीदेखील लाभार्थ्यांच्यावतीने करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)
पोलीस ठाण्यावर धडकला ग्रामस्थांचा मोर्चा
By admin | Updated: September 18, 2015 00:15 IST