रेन हार्वेस्टिंग : बडनेऱ्यातील युवकाचा अभिनव प्रयोगबडनेरा : 'लोकमत'ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाची प्रेरणा घेत बडनेऱ्यातील प्रवीण उके नामक युवकाने येणाऱ्या पावसाळ्याचे पाणी हार्वेस्टिंगने घराच्या आवारातील कोरड्या बोअरवेलमध्ये पुनर्भरण करण्याचे ठरविले आहे. ज्यामुळे भूगर्भात पाण्याची पातळी वाढून उन्हाळ्याच्या दिवसांत जलसंकटावार मात करता येईल, असे नियोजन त्याने केले आहे.मागील तीन वर्षांपासून अल्प पाऊस झाल्याने यावर्षी भूगर्भातील पाणी पातळी कमालीची घटली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पाणी समस्येने भीषण रुप धारण केले आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न सर्वांनाच भेडसावू लागल्याने पाणी बचतीची जनजागृती होण्यासाठी 'लोकमत'ने जलमित्र अभियानातून दिलेल्या संदेशाची प्रेरणा घेत बडनेऱ्यातील जुनी वस्ती परिसरात राहणाऱ्या प्रवीण उके याने स्वत:च्या घरात १५० फुटांपर्यंत बोअरवेल केली. मात्र पाणी लागले नाही. भूगर्भातील पाण्याची पातळी किती घटली हे हेरले. अवघ्या काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होणार, मग पावसाचे पाणी थेट नाल्यात वाहून जाणार. तेच पाणी कोरड्या बोअरमध्ये सोडल्यास जमिनीची पाणीपातळी वाढणार या उद्देशाने त्यांनी कोरड्या बोअरवेलला पाईप जोडला. छतावरील सर्व पाणी एका नालीने पाईपपर्यंत जाईल व ते बोअरवेल साचेल. ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. हा छोटासा प्रयोग आहे. मात्र महत्वाचा आहे. ज्यांनी बोअरवेल केले आहे पण त्याला पाणी नसेल त्यांनी हा उपक्रम राबविल्यास पावसाळ्याच्या दिवसांत जमा झालेल्या पाण्याचा उन्हाळ्याच्या दिवसांत करता येणे सहज शक्य आहे. ज्यामुळे भूगर्भात पाण्याची पातळी वाढेल व पाणी न येणाऱ्या बोअरवेल पाणी द्यायला लागेल. आज असे केल्यास भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल, असे या युवकाने सांगितले. (शहर प्रतिनिधी)
कोरड्या बोअरमध्ये साठविणार पावसाचे पाणी
By admin | Updated: May 30, 2016 00:36 IST