चांदूर रेल्वे : शहराबाहेरील एका हॉटेलमध्ये संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच धाड टाकून १५ हजारांचा दंड वसूल केल्याची कारवाई बुधवारी रात्री ८ वाजता महसूल, पोलीस विभाग व ग्रामपंचायतीच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. ठाणेदार मगन मेहते यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता १५ मे पर्यंत संचारबंदी सुरू आहे. अशातच सर्व हॉटेल, ढाबेसुध्दा बंद आहेत. केवळ ठरावीक वेळ पार्सल सुविधा सुरू आहे. असे असताना चांदूर रेल्वे शहराबाहेरील वर्धा - अमरावती बायपास रोडवर असलेले एक हॉटेल रात्री सुरू असून तेथे काही जण जेवण करीत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. यानंतर महसूल, पोलीस विभाग व सोनगाव ग्रामपंचायतीच्या चमुंनी संयुक्तरीत्या धाड टाकून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लागू असलेल्या कलम १४४ चे उल्लंघन केल्यामुळे हॉटेल मालकाला १० हजारांचा दंड ठोठावला. तसेच जेवन करीत असलेल्या ५ ग्राहकांना प्रत्येकी १ हजार याप्रमाणे ५ हजार रुपये दंड दिला. असा एकूण १५ हजारांचा दंड या कारवाईतून वसूल करण्यात आला. या कारवाईत ठाणेदार मगन मेहते, पोलीस कर्मचारी जगदीश राठोड, अरुण भुरकाडे, महसूल कर्मचारी सतीश गोसावी, नीलेश स्थुल, श्रीराम वानखडे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सहभाग होता.