अमरावती : यंदा रबीसाठी १,४५,१८१ हेक्टर सरासरी क्षेत्र होते. त्यातुलनेत १,७५,४५५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे. ही १२०.८५ टक्केवारी आहे, अजूनही काही भागांत गव्हाची पेरणी होत असल्याने पेरणीक्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांचा आढावा घेतला असता, यंदा रबी पेरणीक्षेत्राचा उच्चांक झालेला आहे.
यंदा ऑगस्टपासून पावसाने लावलेली रिपरीप ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू होती. त्यानंतर झालेला परतीचा पाऊस खरिपासाठी बाधक असला तरी रबी हंगामासाठी पोषक ठरला. यामुळे जमिनीची आर्द्रता वाढली. यामुळेच हरभऱ्याची विक्रमी पेरणी झालेली आहे. सध्या असलेले उबदार वातावरण गव्हाच्या उगवणशक्तीसाठी पोषक असल्याने जानेवारी अखेरपर्यंत गव्हाची पेरणी होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सद्यस्थितीत रबी ज्वारी ३६ हेक्टर, गहू ४६,५२६ हेक्टर, मका १०७८ हेक्टर, करडई २ हेक्टर, जवस ८ हेक्टरक्षेत्रात पेरणी झालेली आहे. गव्हाचे सर्वाधिक १०,१९१ हेक्टर क्षेत्र धामणगाव रेल्वे तालुक्यात आहे. याशिवाय धारणी ८,०२१ हेक्टर व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६,२०६ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. अन्य तालुक्यात मात्र, तीन हजार हेक्टरच्या आत पेरणी झालेली आहे.
बॉक्स
दर्यापूर तालुक्यात हरभऱ्याचे विक्रमी क्षेत्र
यंदा दर्यापूर तालुक्यात उच्चांकी २१,७९४ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. याशिवाय धारणी १३,०४६ हेक्टर, चिखलदरा २,०८७ हेक्टर, अमरावती ६,४३१ हेक्टर, भातकुली ९,२२६ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ८,००३ हेक्टर, चांदूर रेल्वे ५,०२४ हेक्टर, तिवसा ८,५७२ हेक्टर, मोर्शी ७,८९४ हेक्टर, वरुड ३,६९४ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ५८३९ हेक्टर, अचलपूर ४,८९० हेक्टर, चांदूरबाजार ११,६८३ हेक्टर व धामणगाव रेल्वे तालुक्यात १३,६७५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झालेली आहे.