प्रतीक्षा : ग्रामविकासच्या आदेशाची अंमलबजाणी नाहीअमरावती : येत्या फेब्रुवारी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होवू घातल्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचे आरक्षण तातडीने काढण्याचे निर्देश २२ जून रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा प्रशासनाला दिले. मात्र महिन्याभराचा कालावधी झाला असतांनाही प्रशासनाद्वारे आदेशाची अंमलबजावणी नाही. जिल्ह्यातील सर्वच १४ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने राजकीय पुढारी कामाला लागले आहेत. तर प्रशासनानेही निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद सोबतच पंचायत समितीच्याही एकत्र निवडणूका होणार आहे. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली आहे. मात्र पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण सोडत अद्याप निघाली नसल्याने याकडे राजकीय पक्षाच्या नजरा लागल्या आहे. दरम्यान २२ जून २०१६ रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्ह्यातील १४ पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत तातडीने काढण्याचे निर्देश जिल्ह्याच्या निवडणूक विभागाला दिले आहेत. आगामी सभापती पदाची सोडत ही अडीच वर्षासाठी काढली जाणार आहे १४ पंचायत समितीपैकी धारणी आणि चिखलदरा पंचायत समिती वगळता उर्वरित १२ पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी, अचलपूर, दर्यापूर, चांदूरबाजार, वरूड , मोर्शी, तिवसा, धामणगांव रेल्वे, चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्र्वर, अमरावती व भातकुली या पंचायत समितीच्या समावेश आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. मात्र सोडत काढण्यासाठी अद्याप मुहूर्त न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांसोबतच सर्वच राजकीय पक्षाला या आरक्षणाची प्रतीक्षा आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असता लवकरच ही आरक्षण सोडत काढण्यात येईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
पं. स. सभापती पदाच्या सोडतीला मुहूर्त केव्हा?
By admin | Updated: July 19, 2016 00:20 IST