सचिवांचे निर्देश : पालकमंत्र्यांच्या हस्ते धान्य वाटपाचा शुभारंभअमरावती : विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांतील नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येच्या घटनेत वाढ होऊ नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये ज्या कुटुंबांना लाभ मिळत नाही, अशा केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना तांदूळ ३ रुपये व गहू २ रुपये प्रतिकिलो या दराने वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ आॅगस्टपासून हे वाटप स्ुरू करण्यात येणार आहे, असे पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी पुरवठा सचिव कपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपायुक्त (पुरवठा) मावसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखडे तसेच अमरावती विभागातील सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार उपस्थित होते. कपूर म्हणाले की, अमरावती विभागातील अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व नागपूर विभागातील वर्धा या सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांप्रमाणे प्रतीमाह प्रतीव्यक्ती ५ किलो या परिमाणात अन्न धान्याचा लाभ देण्याकरिता केंद्र शासनाकडून (इकॉनॉमिक कॉस्ट)ने 'अ' दर्जाचे तांदूळ व गहू खरेदी करून सदर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अतिरिक्त धान्याच्या मागणीसाठी पाठपुरावा करावा. या योजनेअंतर्गत धान्य वाटपाचे स्वतंत्रपणे नोंदवही ठेवावी. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी दौऱ्यावर असताना त्याची तपासणी करावी. ज्या-ज्या ठिकाणी संभ्रम निर्माण होईल किंवा अडचण येतील येथे संबंधित शेतकऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र घेऊन धान्य वाटप करावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. यावेळी अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत धान्याची उचल, अन्त्योदय योजना, साखर, केरोसीनचे वितरण, गोडाऊन परिस्थिती, कल्याणकारी संस्थांना धान्याचे वाटप, ग्राहक मंचाकडील प्रलंबित प्रकरणे, वजनमापे विभागातर्फे झालेली कार्यवाही याबाबत तपशीलवार आढावा घेतला. जिल्ह्यात २ लाख २३ हजार ७०५ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. यापैकी २ लाख १ हजार ३३४ केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या संख्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली. (प्रतिनिधी)
१५ आॅगस्टपासून केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना सवलतीत धान्यपुरवठा
By admin | Updated: August 14, 2015 00:57 IST