जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी : नदीचे पात्रही वळविणार दर्यापूर : दर्यापूर तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होऊन १८ घरे दोन वर्षात जमीनदोस्त झालेले आहेत. यांचे गावाच्या बाहेर पुनर्वसन करण्यात आले असून शहानूर नदीच्या तीरावर असलेल्या सुकळी वासियांना भूस्खलनाचा धोका असल्याने संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून नदीचे पात्र गावापासून वळविल्या जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सोमवारी पाहणी करुन आढावा घेतला. वडनेर गंगाई येथील जलयुक्त शिवार योजना अभियानांतर्गत गाव तलावाचे खोलीकरणचा शुभारंभाच्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वडनेर गंगाई का आले होते. सुकळीचा भूस्खलनाचा प्रश्न गंभीर असल्याने आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुकळी येथे भेट देण्याची विनंती केली. याठिकाणी आमदार रमेश बुंदिले, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, तहसीलदार राहुल तायडे व सर्व विभागाचे अधिकारी अभियंते उपस्थित होते. सुकळी हे गाव शहानूर नदीच्या तीरावर वसले असून या ठिकाणी २१८ कुटुंब राहतात, गावाची लोकसंख्या ८०० एवढी आहे परंतु शासनाच्या योजनेचा लाभ त्वरित मिळत नसल्याने संपूर्ण गावाचे पुनर्वसन करण्यास लोकांनी प्रशासनाला नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत टप्प्या-टप्प्याने भूस्खलन झाल्याने १८ घरे पूर्णत: जमीनदोस्त झाली. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले. मात्र कुठलीही जिवीत हानी झाली नाही. यापूर्वीही जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी सुकळी येथे भेट देऊन पाहणी केली होती. भूवैज्ञानिकांनीही पाहणी करून याचा अहवाल प्रशासनाला सादर केला होता. (प्रतिनिधी)४२ लक्ष रुपयांच्या निधीतून बांधणार संरक्षण भिंत४२ लक्ष रुपयांच्या निधीतून सुकळी या गावात शहानूर नदीच्या तिरावर संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे. या गावाला भूस्खलनाचा नदीच्या तिराचा धोका असल्यामुळे या ठिकाणी प्रशासन संरक्षण भिंत बांधणार आहे व या ठिकाणचा नदीचा प्रवाह दुसऱ्या दिशेला वळविल्या जाणार असल्याचेही विचाराधीन आहे. ‘लोकमत’ने केला होता पाठपुरावा!भूस्खलनाचा पहिला प्रश्न निकाली निघावा यासाठी ‘लोकमत’ने अनेक वेळा वृत्त प्रकाशित करून हा प्रश्न लोकदरबारात मांडला. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे होऊन हा प्रश्न प्रशासन स्तरावर मार्गी लागला आहे. प्रकाश भारसाकळे यांनी दिले निर्देशसुकळी येथील भूस्खलनामुळे गावाला धोका असल्यामुळे संरक्षण भिंत बांधण्याची प्रक्रिया त्वरित करावी, असे निर्देश आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनीही याची दखल घेऊन हे काम लवकर सुरू करावे, अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
सुकळीच्या शहानूर नदीवर बांधणार संरक्षण भिंत
By admin | Updated: May 16, 2016 00:12 IST