खासदारांच्या पत्राला उत्तर नाही : सुरक्षा आयुक्तांची टोलवाटोलवीअमरावती : बडनेरा, अमरावती आणि नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव बारगळला आहे. मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांनी यासंदर्भात प्रस्ताव पाठविला नसल्याने खासदारांना निधी उपलब्ध करुन देता आला नाही. त्यामुळे तीनही रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविता आले नाही, अशी माहिती आहे.खा. आनंदराव अडसूळ यांनी अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर साडेअकरा लाख रुपयांची स्टेनलेस स्टिलची आसन व्यवस्था करुन देताना सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा पुरविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही सीसीटीव्ही कॅमेरे रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या स्थळी लावण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला नाही. विशेषत: रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांना खासदार अडसूळ यांनी पत्र पाठवून देखील सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने मागणी करु नये, हे कळू शकले नाही. बडनेरा, अमरावती व नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर वाढत्या चोऱ्या, तिकिटांचा काळाबाजार, स्वच्छतेचा बोजवारा, रेल्वे संपत्तीची चोरी, अनधिकृत वेंडर्स, तृतीयपंथीयांचा हैदोस या कॅमेऱ्यात कैैद करुन रेल्वे सुरक्षा बलाला कारवाई करणे सोयीचे जावे, हा सीसीटीव्ही लावण्यामागे खासदारांचा उद्देश होता. परंतु रेल्वे सुरक्षा बलाने अद्यापही प्रस्ताव पाठविला नाही, हे वास्तव आहे. रेल्वे आरक्षण खिडक्यांवर तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी दर्शनी भागात कॅमेरे लावल्यास हा काळाबाजार थांबविता येणे शक्य आहे. एवढेच नव्हे तर प्लॅटफार्मवर अवैध वेंडर्स, खाद्यपदार्थांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून नजर ठेवता येणे सोयीचे होईल. असा प्रकार उघडकीस आल्यास त्यावर कारवाई करून घडणारे गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊ शकते. सर्वच विभागात सुरक्षा यंत्रणा हाताळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली जात असताना रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष का बरं चालविले हा संशोधनाचा विषय ठरत आहे.बडनेरा प्लॅटफार्म सफाईचा कंत्राट ७० लाखांचाबडनेरा रेल्वे स्थानकावर सफाईचा कंत्राट वर्षाकाठी ७० लाख रुपयांना सोपविण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदारांचे कर्मचारी सफाई करीत नसल्याची ओरड असताना त्याची देयके काढली जात असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाही. परिणामी सफाईसंदर्भात अंकुश लावता येत नाही. मात्र सीसीटीव्हीअभावी सुरक्षा यंत्रणेसह नियमबाह्य बाबींवर अंकुश कसे लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे.सीसीटीव्ही लावण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या सुरक्षा आयुक्तांना जाब विचारला जाईल. प्रवाशांच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा आवश्यक असून त्या लवकरच सुरु होतील.- आनंदराव अडसूळ,खासदार, अमरावती.
रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्ताव बारगळला
By admin | Updated: May 25, 2015 00:01 IST