अमरावती : जिल्ह्यात उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील वाड्यांसाठी ५६ तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा राबविण्यात येणार आहे. यावर २ कोटी ६३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. कितीही पाऊस पडला तरी जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसते. दरवर्षी मेळघाटसह गैरआदिवासी भागातील काही टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो तसेच विंधन विहिरी, नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात येतात. गतवर्षी एका बाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाच दुसऱ्या बाजूला जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागले होते. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र, दुर्गम भागातील अनेक वाड्या-वस्त्यांपर्यंत पाण्याचे टँकर पोहचविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे लोकांची पाण्यासाठी कसरत सुरू होती.
दरम्यान, दरवर्षी टंचाईवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. शेकडो पाणीपुरवठ्याच्या योजना दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र, यावर पुढील वर्षी खर्चाचा आकडा वाढताच असतो. दरम्यान यंदाच्या टंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यात गावांमध्ये तात्पुरत्या पूरक पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहेत. टंचाईच्या कालावधीत या योजना राबविण्यात येणार आहेत. टंचाईग्रस्त नवीन पूरक नळ योजनांमुळे पाणी समस्या सोडविण्यासाठी दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बॉक्स
भटकंती थांबावी
जिल्ह्यातील दुर्गम भागात पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्रपणे जाणवत असता, यात मेळघाटातील काही गावातील पाण्याचे जलस्रोत आटू लागले की, महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. उन्हाळ्यात त्या काळात पाणीटंचाईचा दाह कमी होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पूरक नळ पाणीपुरवठा योजना हाती घेतल्या जातात.