अमरावती: जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील बदलीपात्र कर्मचार्यांची बदली प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान बुधवारपासून विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आरोग्य विभागातील कर्मचार्यांच्या बदलीची प्रक्रिया आचारसंहितेच्या सावटाखालीच पार पडली. अद्यापही बदली आदेशांबाबत अनिश्चिततेचे सावट आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आटोपताच जिल्हा परिषदेत रविवार १८ मे पासून बदली प्रक्रिया सुरु झाली. याच कालावधीत बालकांचा मोफत सक्तीचा अधिकार कायदा २00९ (आरटीआई) नुसार अतिरिक्त ठरलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे बदली प्रक्रियेपूर्वी समायोजन करावे, असे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदेला दिले. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया रद्द करण्यात आली. परिणामी जिल्हा परिषदेत इतर विभागातील बदलीपात्र कर्मचार्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु आहे. बुधवारी जिल्हा परिषदेत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक, महिला आरोग्य सेवक, सहायक आरोग्य सेवक, सेविका, औषधी निर्माता, पर्यवेक्षक अशा सुमारे ७0 कर्मचार्यांच्या प्रशासकीय विनंती बदल्यांची कारवाई दुपारी ११ वाजता सुरु करण्यात येणार होती. ही प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची चर्चा सुरु झाली. अखेर याबाबत शहनिशा करण्यासाठी जिल्हा परिषदेत धावपळ सुरु होताच विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हा परिषदेत धडकले. मात्र, या पत्रातील मजकूर लक्षात घेता बदली प्रक्रिया होणार की नाही? यावर पुन्हा खल सुरु झाला आहे. अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेला ई मेल मागविला. या पत्रातील मजकुराचे सीईओंनी बारकाईने अवलोकन केले. मात्र, यामध्ये बदल्यांबाबत कारवाई करावी अथवा करु नये, याबाबत उल्लेख नाही; तरीही सीईओनी थेट मंत्रालयातील वरिष्ठ स्तरावर संपर्क करुन माहिती घेतली. याशिवाय नागपूर, अकोला, यवतमाळ येथील जिल्हा परिषदेत बदल्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले. अखेर दुपारी १ वाजता आरोग्य विभागीतल आरोग्य सेवक, पुरुष व महिला तसेच औषध निर्माता, पर्यवेक्षक आदी पात्र कर्मचार्यांच्या बदल्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. त्यामुळे धावपळ वाढली. परंतु आचारसंहिता लक्षात घेता जिल्हा परिषदेत केलेल्या बदल्यांची प्रक्रिया कायम राहणार की रद्द होणार याबाबत मात्र सध्यातरी अनिश्चितता आहे. तुर्तास बदली प्रक्रिया आचारसंहितेत सुरू आहे. (प्रतिनिधी)
आचारसंहितेच्या सावटात बदल्यांची प्रक्रिया
By admin | Updated: May 22, 2014 00:41 IST