१ डिसेंबरपासून प्रारंभ : आठवड्यात गुरुवारी होईल प्रसारणअमरावती : पाषाण भिंतीच्या गजाआड असलेल्या येथील तुरुंगातील बंद्यांसाठी १ डिसेंबरपासून आकाशवाणीवर ‘कैद्यांची फरमाईश’ हा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. त्यामुळे आता बंद्यांच्या आवडी- निवडीचे गीते त्यांच्या आप्तस्वकीयांना सुद्धा ऐकता येईल. आठवड्यात गुरुवारी हा कार्यक्रम प्रसारीत होणार आहे.कारागृह प्रशासनाचे बंद्यांची सुधारणा व पुनर्वसन या उपक्रमातंर्गत अपर पोलीस महासंचालक तथा कारागृह महानिरिक्षक भूषण उपाध्याय, कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जाणार आहे. कारागृहाचे अधीक्षक भाईदास ढोले यांनी बंद्यांसाठी विविध उपक्रम राबविण्याची मालिका सुरु केली असताना यामध्ये ‘कैद्यांची फरमाईश’ या वेगळ्या उपक्रमाने आणखीच भर घातली आहे. कारागृहात बंद्यांची दिनचर्या ही सूर्योदय ते सूर्यास्त अशी ठरलेली आहे. प्रत्येक बंदीजनांच्या क्षमतेनुसार त्यांच्या हाताला काम दिले जाते. मात्र उत्तुंग भिंतीआड फावल्या वेळेतही त्यांच्या मनात न्यूनगंड, नैराश्याची भावना निर्माण होऊ नये, यासाठी बंद्यांना गुंतवून ठेवण्याचे प्रयत्न कारागृह प्रशासनाच्यावतीने सातत्याने सुरु आहेत. हल्ली कारागृहात दीड वर्षांपासून आकाशवाणी व रेडीओ मिर्चीचे प्रसारण केले जाते. परंतु बंद्यांच्या आवडी-निवडीची सिने गीत आकाशवाणीवरुन प्रसारीत व्हावी, यासाठी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी येथील आकाशवाणी केंद्राच्या सोनाली शर्मा यांच्याशी पत्रव्यवहार चालविला. सामान्यांप्रमाणे बंद्यांनाही आकाशवाणी केंद्रावरुन न्याय मिळावा, याकरिता पाठपुरावा केला. अखेर आकाशवाणी केंद्राने आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी ‘कैद्यांची फरमाईश’ हा कार्यक्रम प्रसारीत करण्यास होकार दिला आहे. त्यामुळे येत्या डिंसेबर महिन्यात बंद्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या आवडीचे गिते ऐकण्याची संधी मिळणार आहे. मनोरंजनाचे साधन म्हणून कैद्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. (प्रतिनिधी)मेलद्वारे पाठविली जाईल गितांची माहितीकारागृहातील ‘कैद्यांची फरमाईश’ या कार्यक्रमासाठी आकाशवाणी केंद्राला मेलद्वारे गितांची माहिती पाठविली जाणार आहे. आठवड्यातील प्रत्येक गुरुवारी दुपारी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान ही गीत प्रसारीत होतील. त्याकरिता आकाशवाणी केंद्र प्रायोजक शोधत असल्याची माहिती आहे. कारागृहात बराकीत गितांची माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र बॉक्स लावले जाणार आहे.‘‘ कैद्यांचे मनोरंजन होऊन त्यांची दिनचर्या व्यवस्थित जावी, यासाठी कैद्यांची फरमाईश हा आकाशवाणीवर कार्यक्रम प्रसारीत होणार आहे. प्रत्येक आठवड्यात सहा कैद्यांच्या आवडीचे गिते प्रसारीत होतील. त्याकरिता काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.- भाईदास ढोलेअधीक्षक, मध्यवर्ती कारागृह
‘कैद्यांची फरमाईश’ आता आकाशवाणीवर
By admin | Updated: November 17, 2016 00:15 IST