गारपीट : तूर, गहू, हरभऱ्याला संजीवनी, दोन दिवस आणखी बरसणारअमरावती : बुधवारपासून अचानक सुरू झालेल्या अकाली पावसाने जिल्हा चिंब झाला. थर्टी फर्स्टच्या मध्यरात्रीपासून शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. १ जानेवारीला दिवसभर थोड्या-थोड्या वेळाने पाऊस बरसत होता. १ जानेवारीला जिल्ह्यात २३.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. मध्यरात्रीपासून अचानक कोसळलेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कपाशी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली. हा माल खरेदीदारांचा होता. पावसामुळे शेतकऱ्यांनी माल बाजार समितीत न आणल्याने त्यांची हानी टळली. पावसामुळे गहू, हरभऱ्याची या पावसामुळे फारशी हानी झाली नसली तरी संत्र्याच्या आंबिया बहराची हानी मात्र झाली आहे. अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे नववर्षाच्या पहाटे रस्त्यांवर शुकशुकाट होता. प्रत्येकाने घरातच नववर्षाचे कौटुंबिक स्वागत केले. दर्यापूर तालुक्यातील घडा सांगवा येथे बुधवारी रात्री १०.३० वाजतादरम्यान चक्रीवादळासह बोराच्या आकाराच्या गारांचा तब्बल १५ मिनीट वर्षाव झाला. यामध्ये घरावरील टिनपत्रे उडाली, शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने जिवीत हानी झाली नाही. अचलपूर तालुक्यातील मल्हारा व कविठा परिसरात बुधवारी रात्री १५ ते २० सेकंदापर्यंत हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या. बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची रिपरीप गुरुवारी दुपारपर्यंत सुरूच होती. तालुक्यात ५० मि.मी. पर्यंत पावसाची नोंद झाली होती. जिल्हाभरात सर्वच ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. बच्चे कंपनीने पावसाचा मनसोक्त आनंद लूटला.
अकाली पावसाचा तडाखा
By admin | Updated: January 1, 2015 22:52 IST