चांदूरबाजार : खासगी शाळांकडे पालकांचा कल वाढत असताना तालुक्यात मागील दोन वर्षांत जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत कमालीची सुधारणा झाली आहे. चांदूरबाजार तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळांची संख्या ७३ व जिल्हा परिषद माध्यमिक शाळांची संख्या ४८ अशा एकूण १२१ शाळा आहेत. या शाळांतून ९ हजार ५८५ विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील दोन वर्षांपासून येथे ईर्शाद खान हे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यांच्याकडे काही काळ प्रभार देण्यात आला होता. तालुक्यात दररोज जिल्हा परिषद व खासगी शाळांतील २१ हजार ९८२ विद्यार्थी शालेय पोषण आहाराचा लाभ घेतात. पोषण आहारातील गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी पोषण आहार अधीक्षक सतीश मुगल प्रयत्नरत आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुक्यातील शिरसगाव कसबा, करजगाव, ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, आसेगाव पूर्णा यासारख्या मोठ्या शाळांकडे लक्ष केंद्रित केले. ग्रामीण भागातील शिक्षकांना प्रशिक्षणासोबतच गुणवत्ता अधिक वाढविण्याचे धडे त्यांनी दिले. गतवर्षी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापकांना प्रशिक्षण, बालशिक्षण हक्क कायदा तसेच वयानुरुप शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली. राज्य व केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या आम आदमी विमा योजनेचा लाभ ४३०० विद्यार्थ्यांना देण्यात आला. अनुसूचित जाती-जमातीच्या २९९ व भटक्या-विमुक्त जातीच्या २७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पाया ठरविण्यात आला. सर्वसामान्यांची ओळख देणारे आधार कार्ड तर ९० टक्के विद्यार्थ्यांनी काढण्याचा विक्रमही तालुक्यात झाला. पालक स्वत: विद्यार्थ्यांना शाळेत शिक्षकांच्या विश्वासावर सोडून शेत मजुरीच्या कामाला जातात. त्यामुळे शाळेच्या वेळेतच या विद्यार्थ्यांचा अभ्यास करुन घेण्याचे निर्देश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. एकीकडे जि.प. शाळांचा दर्जा खालावत असल्याची ओरड करून येथील शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत ओरड केली जाते. परंतु तालुक्यातील चित्र सुखावह आहे(तालुका प्रतिनिधी)
जि.प.शाळांची गुणवत्तेत आगेकूच
By admin | Updated: September 1, 2014 23:15 IST