अमरावती : राज्य विधिमंडळाची पंचायत राज समितीचा ६ ते ८ ऑक्टोबर असा तीन दिवसांचा दौरा निश्चित झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा गत काही दिवसापासून कामाला लागली आहे. सध्या मिनी मंत्रालयात रंगरंगोटी, डागडुजीच्या कामांना वेग आला आहे. समितीच्या दौऱ्यात कुठलीही उणीव दिसून नये, याची पुरेपुर काळजी यंत्रणेकडून घेतली जात आहे. याकरिता स्वत: वरिष्ठ अधिकाऱ्यापासून तर कर्मचाऱ्यापर्यंतची सर्वच जण लक्ष घालून आपल्यावरील जबाबदारीनुसार कामकाज पार पाडत आहेत.
पंचायत राज समिती सलग तीन दिवस जिल्हा दौऱ्यावर आहे. या समिती २७ आमदारासह सात निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. समितीने पाठविलेल्या कार्यक्रमानुसार सन २०१६-१७ या वर्षातील लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन २०१७-१८ चा वार्षिक प्रशासन अहवालाचे परीक्षण केले जाणार आहे. यानुसार प्रश्नावलीप्रमाणे प्रशासनाकडूृन माहिती संकलित केली जात आहे. यासोबतच समिती सदस्यांची बैठकीसाठी करण्यात आलेल्या आसन व्यवस्थेसाठी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाची रंगरगोटी, माईक सिस्टीम, इलेक्ट्रीक कामांची दुरुस्ती, खराब झालेले पीओपीओ बदलविणे, अधिकाऱ्याच्या दालनातील देखभाल दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याकरिता प्रत्येक विभागाचे अधिकारी स्वत: लक्ष घालून ही कामे करून घेत असल्याचे चित्र मिनी मंत्रालयात दिसून येत आहे.
बॉक्स
सलग बैठकी
पंचायत राज समितीच्या दौऱ्याचा कार्यक्रम धडकताच जिल्हा परिषदेची प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पीआरसीच्या आदेशानुसार पाठविण्यात आलेल्या प्रश्नावलीप्रमाणे विविध विभागांकडून कामे केली जात आहेत वा नाही, याची इत्थंभूत माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी घेत आहेत. याकरिता दररोज खातेप्रमुखांच्या बैठकी सध्या जोरात सुरू आहेत.