-------------------------------------------------------------------------------------------
कोरोनामुळे रखडलेल्या प्रक्रियेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेध
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० जूनपर्यंत राज्य शासनाने बदल्यांवर स्थगिती दिली होती. ही डेडलाईन आता संपली आहे. बऱ्याच जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांना बदली प्रक्रियेची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, राज्य शासनाकडून बदल्यांबाबत अद्याप कुठल्याही ठोस निर्णयाची घोषणा झालेली नाही.
गत मार्च-एप्रिलमध्ये जिल्ह्यासह राज्यभरात कोरोना थैमान घातले होते. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाट अनेक नागरिकांनी त्यांचे आप्तस्वकीय आणि जवळच्या व्यक्ती गमावल्या. कोरोना हाहाकार बघता, शासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागल्या. परिणामी या संकटसमयी सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या ३० जूनपर्यंत बदली न करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु, जूननंतर परिस्थितीचा आढावा घेत बदल्या केल्या जातील, असे स्पष्ट केले होते. सध्या राज्यभरातील तीन ते चार जिल्हे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये आजघडीला कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. बदल्यांसाठी शासनाने दिलेली मुदत संपुष्टात आली आहे. परिणामी तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असलेल्या तसेच विनंती बदल्यांसाठी इच्छुकांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. दुर्दैवाने ही लाट ओढवल्यास किमान तीन महिने तिचा प्रभाव राहील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी बदल्यांसाठी पुढील मार्च-एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. त्यामुळे शासनाने आता तातडीने बदल्यांची प्रक्रिया सुरू करावी, अशी चर्चा खासगीत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे.
बॉक्स
बदल्यांसाठी लॉबिंग
बदल्यांकरिता उत्सुक असलेले अधिकारी व कर्मचारी शासकीय यंत्रणेत कमी नाही. मात्र, शासनाकडून बदल्याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नाही. परंतु, बदल्याबाबत शासनस्तरावरून हालचाली सुरू झाल्यास सोईच्या ठिकाणी पदस्थापना मिळावी याकरीता प्रयत्न केले जात आहेत.
----------------