अमरावती : गरिबांचे अंधारलेले जीवन प्रकाशमान करण्यासाठी समाजकल्याण विभागाने सुरु केलेली कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना दिवसेंदिवस वाढत असली तरी बाजार भावाच्या चक्रव्यूहात अडकली आहे. योजनेसाठी खरेदी करावयाच्या जमिनीचे बाजारभाव एकरी २० लाखांच्याही पुढे गेल्याने जमिनी खरेदी करणे व लाभार्थ्यांना देणे या दोन्हीही कामात पूर्ण शिथिलता आली आहे. वाढत जाणाऱ्या बाजारभावामुळे अत्यल्प किमतीत जमीन विकावयास कोणी तयार नाहीत व जमीन उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी त्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे वाढलेल्या बाजारभावाने या चांगल्या योजनेला घरघर लागली आहे. अनुसूचित जमाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सध्या अडचणीत आहेत. लाभार्थीसाठी खरेदी करावयाच्या शेतजमिनीचे बाजारभाव प्रचंड वाढले आहे. त्या तुलनेत शासनाकडून जमिनीस दिले जाणारा बाजारभाव प्रती एकर तीन लाख रुपये इतका कमी असल्याने शासनाला जमिनीच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात या कमी असलेल्याने योजनेस प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. २००४-२००५ मध्ये सुरु केलेल्या सबलीकरण योजनेस सुरुवातीच्या काळात चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यानंतरच्या तीन वर्षांतच जमिनी मिळण्याचे प्रमाण खालावले. ते २०११-१२ मध्ये अगदी शून्यावर आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या तीन लाख रुपये प्रतीएकर सरकारी भावामुळे जमिनी द्यावयास कोणी तयार होत नसल्याचा शेरा मारुन अहवाल व शिल्लक राहिलेला निधी सरकारकडे पाठविला गेला. या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी आता शासनस्तरावरुन प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात २००५ पासून २१६ लाभार्थींना ७६२ एकर जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. चालू वर्षात परिस्थिती बिकट झाली असून आतापर्यंत केवळ २१६ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. दरम्यान, शासनाने जमीन खरेदी करताना ठरवून दिलेल्या दराच्या तुलनेत जमिनीचे बाजारभाव प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे जमिनी खरेदी करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने लाभार्थीना शेतजमिनी देण्यात अडसर येत असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गरिबांच्या योजनेला घरघर
By admin | Updated: February 9, 2015 23:06 IST