लोकमत विशेषजयप्रकाश भोंडेकर शेंदुरजनाघाटसातपुड्याच्या पायथ्याशी काढलेल्या हळदीला ‘घाटावरची हळद' म्हणून ओळखली जाते. दोन वर्षांपूर्वी हळदीला चांगले भाव मिळाल्याने उत्पादाचे प्रमाण वाढले. परंतु हल्ली हळदीला कवडीमोल भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. यामुळे कृषी विभागाने मसाले पिकाच्या योजना हळद उत्पादक शेतकऱ्यांना द्याव्या, अशी मागणी आहे. तालुक्यातील औद्योगिकतेत भौगोलिकनकाशात शेंदूरजनाघाटला महत्त्वाचे स्थान मिळाले. हळदीपासून कुंकूसुध्दा तयार केले जात होते. परंतु बदलत्या काळानुरुप येथील कुंकवाचे कारखाने बंद पडले. हळद नुसती मसाल्यापुरतीच मर्यादित न राहता आयुर्वेदिक औषधी म्हणून उपयोगात असल्याने हळदीला मागणी वाढत असली तरी उत्पादन होत नाही. उत्पादनाला बाजारपेठ नाही. यामुळे जिवापाड मेहनत करुन उत्पादित हळद दलालांकडून व्यापाऱ्यांच्या घशात दिल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरत नव्हता. उत्पादन खर्च परवडत नसल्यामुळे या पिकाकडे दुर्लक्ष होत आहे. वेळोवेळी यावर रासायनिक खत, कीटकनाशके आदींचा खर्च होतो. एकूण १० महिन्यांचे हे पीक असते. हळदीला विक्रीयोग्य बनविण्याकरिता शिजविण्यात येते.यावर्षी यासाठी दोन ठिकाणी उकाडे सुरु आहे. उकाडयावर मोठी चूल असून त्यावर एक लोखंडी कढई असते. यामध्ये १/३ पाणी टाकून हळदीची मोड टाकली जाते. एकावेळी ८ क्विंटल हळद शिजविण्याची क्षमता या कढईची आहे. कढईमध्ये टाकलेल्या हळदीच्या मोडीवर पाणी टाकले जाते. हळदीवर गोणपाट किंवा तरट झाकून त्या हळदीचा पालापाचोळा टाकतात. १५ ते २० मीनीट हळद उकळण्याची प्रक्रिया होऊन वाफ बाहेर येताच तो उकाडा बंद करुन हळद खळ्यावर टाकली जाते. शिजविलेली हळद १५ ते २० दिवस वाळविली जाते. वाळलेली हळद ज्याला सूट म्हणतात. ती बाजारात चिल्लर विक्रीमध्ये २०० ते २५० रुपये किलोप्रमाणे विकली जाते. परंतु मोठी बाजारपेठ नसल्याने व्यापाऱ्यांचे दलाल हळदीची खरेदी करतात. यामध्ये खंडी किंवा क्विंंटलचे माप लावले जाते. खंडीमध्ये दोन क्विंटल हळद मोजली जाते. यामुळे ठोक विक्रीमध्ये १४ ते १५ हजार रुपये खंडीचे दर मिळतात. क्विंटलनुसार ७ ते ८ हजार रुपये दराने मागणी असल्याचे सांगितले जाते. येथून खरेदी झालेली हळद विदेशात जाते. परंतु खर्चिक आणि मेहनतीचे पीक असताना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.मात्र आता भावात घसरण झाल्याने हळद उत्पादनक्षेत्र कमी झाले. पुढील वर्षाकरिता यातूनच बीज राखून ठेवून ते एका खोल खड्ड्यात झाकून ठेवण्यात येते. हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्याकरिता शासनाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत मसाला पीक प्रात्यक्षिके योजनेतून हेक्टरी ११ हजार २८० रुपयांचे हळद लागवड प्रोत्साहन अनुदान दिले जाते. शेंदूरजनाघाटमध्ये पारंपरिक पध्दतीने हळदीचे उत्पादन घेण्यात येते. हळदीमुळेच कुंकवाचे कारखाने शेंदूरजनाघाटमध्ये होते. परंतु काळाच्या ओघात आणि राजाश्रय न मिळाल्याने कुंंकवाचे कारखाने बंद पडले. यामुळे शासनाने बहुगुणी हळदीवर प्रक्रिया करणारा उद्योग उभारल्यास हळद उत्पादन क्षेत्रात वाढ होऊन रोजगार आणि चांगले भाव मिळेल. -संजय डफरे, शेंदूरजनाघाट.पावसाने दडी मारल्याने हळदीचे उत्पादनात घट झाली. केवळ ४० टक्के उतपदन राहिले. तरीदेखील योग्य भाव मिळत नाही. हळद मसाले पीक असताना कृषी विभागाने योजना बंद केली. महागाईच्या काळात हळद पीक मशागतीला महाग झाले. भाव मिळत नसल्यामुळे हळद उत्पादकांना उभारी देण्यासाठी शासनाने मसाले पिकांच्या योजना सुरु करुन शेतकऱ्यांना प्रात्साहित करावे - संजय बेले, शेंदूरजनाघाट हळद उत्पादकशासनाने हळदीला मसाले पिकांचे अनुदान देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हळदीकरिता स्वतंत्र बाजारपेठ निर्माण झाल्यास चांगले बाव मिळेल. यातून हळद उत्पादकांना न्याय मिळेल. या हेतूने शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पनात भर पडेल. -गुलाबराव श्रीखंडे, शेंदूरजनाघाट.
घाटावरची हळद भावामुळे कवडीमोल
By admin | Updated: February 26, 2015 00:15 IST