धारणी : हरिसाल वनविभागातील कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी सायंकाळी ७ वाजता उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. दिलेले काम वेळेत पूर्ण केल्यामुळे ते शेजारच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात सलत होते. त्या कर्मचाऱ्यांनी डीएफओ विनोद शिवकुमारचे कान भरले. त्यामुळे विनोद शिवकुमारकडृून होणाऱ्या ‘मेंटली टॉर्चर’मध्ये भर पडली, असे दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. दीपाली यांच्याविरुद्ध शिवकुमार यांचे कान भरणारे कर्मचारी कोण? त्यांचा शोध घेतला जाणार आहे. तपासादरम्यान अनेक बाबींबा उलगडा होत जाईल, त्यात त्या झारीतील शुक्राचाऱ्यांची नावेदेखील समोर येण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांच्या हरिसाल वनपरिक्षेत्रात दिलेले कामकाज वेळेत पूर्ण केले जात होते. त्यामुळे हरिसाल वनपरिक्षेत्रातील कामकाजात इतर रेंजच्या पुढे जायला लागले. तेव्हा आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचे कान भरायला सुरुवात झाली. ते इतक्या हलक्या कानाचे निघाले, की त्यांनी कोणत्याही बाबीची चौकशी न करता दीपाली चव्हाण यांच्या नावाच्या नोटीस काढणे सुरू केले. काहीही खटकले दीपाली यांनाच वारंवार निलंबित करण्याची धमकी देऊन चार्जशिटची धमकी देत होते. त्यासह वारंवार दीपाली चव्हाण यांना नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडत होते. कोणतीही अडचण समस्या सांगितली की, समजून न घेता कमीपणा दाखवण्याचे कारण शोधून गावकरी कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ करून अपमानित करत होते. त्यामुळे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांचे कान आजूबाजूचे कोणते कर्मचारी भरत होते, याचा शोध घेणेसुद्धा महत्वाचे ठरले आहे. कारण कनिष्ठ कर्मचारी विनोद शिवकुमारच्या सावलीतसुद्धा उभे राहत नव्हते. त्यांच्या आक्रस्ताळ्या स्वभावामुळे त्यांच्याशी बोलणे तर कठीणच. त्यामुळे दीपाली यांच्याविषयी कान भरणारे कर्मचारी नक्कीच वरिष्ठ असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तशी चर्चा मेळघाटात रंगली आहे.
बॉक्स
गुगामाल वन्यजीव विभागात चार वनपरिक्षेत्र कार्यालये
गुगामाल वन्यजीव विभागातील चार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांपैकी हरिसाल वनपरिक्षेत्रातच फक्त महिला वनाधिकारी कार्यरत होत्या. इतर तीनही वनपरिक्षेत्रात पुरुष अधिकारी कार्यरत आहेत. दीपाली चव्हाण या धाडसी आणि प्रामाणिक असल्यामुळे त्यांनी पुरुषाला लाजवेल, अशी कामे करून मांगिया, मालूर व चौराकुंड या तीन गावांचे पुनर्वसन केले. रोजगार हमीची कामे करून सर्वाधिक आदिवासी बांधवांना रोजगार मिळवून दिला. त्यामुळे त्यांचे हरिसाल रेंज अग्रक्रमावर आले. ते नेमके आजूबाजूच्या कोणत्या कर्मचाऱ्यांना खटकले, याचा शोध घेणे गरजेचे झाले आहे.