गृहमंत्रालयाची परवानगी : २९ मार्च रोजी करणार अर्ज अचलपूर : सात महिन्यांपूर्वी घडलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील चार आरोपींना उच्च न्यायालयातून मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी पोलीस आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. त्यासाठी राज्याचे मुख्य सचिव व गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची अचलपूरच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. संपूर्ण जिल्ह्यात गाजलेल्या अमित बटाऊवाले हत्याकांडातील १५ आरोपी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात होते. पैकी मो. शरीक अब्दुल रहमान, मो. मतीन मो. जाफर, अशफाक ऊर्फ मो. जाफर यांना २९ फेब्रुवारी तर मो. आदील मो. अन्वर यांना २ मार्च २०१६ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून जामीन मंजूर करण्यात आला होता. पोलीस या निर्णयाविरूध्द सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याने सर्वोच्च न्यायालयातून या आरोपींचा जामीन नामंजूर झाल्यास त्यांना पुन्हा कारागृहात जावे लागेल. जामीन नामंजूर झाल्यास कारागृहातअमरावती : अचलपूर येथे मागील वर्षी ११ आॅगस्टला रेती तस्करांच्या बारूद गँगने अमित बटाऊवाले नामक युवकाची हत्या करून त्याचे वडील मोहन बटाऊवाले यांना गंभीर जखमी केले होते. या हत्याकांडात नगरसेवक मो.शाकीर गुलहुसेन याचेसह १५ आरोपींना अचलपूर पोलिसांनी टप्प्याटप्प्याने अटक केली होती. आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी नरेंद्र ठाकरे व तपास अधिकारी ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार अजय आकरे या दोघांनी कसब पणाला लावले होते. हत्याकांडात सरकारतर्फे मुंबई येथील उमेशचंद्र यादव पाटील यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाला २१ ते २८ मार्च रोजी सुटी असल्याने २९ मार्च रोजी पोलीस या चार आरोपींचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत. त्यासाठी पोलीस २७ मार्च रोजी दिल्लीला रवाना होणार आहेत. (शहर प्रतिनिधी)
जामीन रद्द करण्यासाठी पोलीस सर्वोच्च न्यायालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2016 00:09 IST