गस्त सुरु : ‘मोक्का’चे ११ तर मुंबई बॉम्बस्फोटातील दोन आरोपी बंदिस्त अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृह अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी प्रसिद्ध असले तरी येथे ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) अंतर्गत ११ तर मुंबई बॉम्ब स्फोटातील दोन आरोपी बंदिस्त असल्यामुळे सुरक्षेबाबतची काळजी घेतली जात आहे. परिणामी तटा भोवताल पोलिसांची गस्त सुरु करण्यात आली आहे.अमरावतीच्या कारागृहात ११५० पेक्षा अधिक महिला व पुरुष बंदी आहेत. येथे मनुष्यबळाची वानवा ही नित्याचीच बाब असून कारागृह प्रशासनांतर्गत सुरक्षेसाठी गृहरक्षक दला (होमगार्ड) चे सहकार्य घेत आहे. सुरक्षा रक्षकांचा तुटवडा असल्याबाबत कारागृह प्रशासनाने वरिष्ठांना कळविले आहे. मात्र, अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याबाबत फारशी दखल घेतली गेली नाही. मागील महिन्यात नागपूर व चंद्रपूर येथून प्रसिद्ध खटल्यातील मोक्काचे ११ आरोपी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे पाठविण्यात आले आहेत. कारागृहाच्या मागील बाजूस राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ नागपूर वळण मार्ग गेल्यामुळे बाह्य सुरक्षेची अतिशय काळजी घेतली जात आहे. मध्यवर्ती कारागृह हे नागरी वस्तीत असून सभोवताल वर्दळ असते. त्यामुळे तटाभोवती पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. फ्रेजरपुरा पोलिसांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांकडून कारागृह संरक्षण भिंतीलगत सतत गस्त घातली जात आहे. कारागृहाच्या तटावर दोन सुरक्षा मनोरे असून या मनोऱ्यावर २४ तास सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. नागपूर राष्ट्रीय महामार्ग तसेच अमरावती-चांदूररेल्वे मार्गाहून ये-जा करणारी वाहने, संशयास्पद व्यक्तींवर करडी नजर ठेवली जात आहे. कारागृह तटाच्या काही अंतरावर झोपडपट्टी असून येथील रहिवाशांवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. कारागृहाच्या बाह्य सुरक्षेत कोणतीही उणिव राहू नये, यासाठी कारागृहाचे अधीक्षक बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
कारागृहाच्या तटाला पोलिसांचे संरक्षण
By admin | Updated: February 10, 2016 00:18 IST