अमरावती : तब्बल १५० कि.मी.चा पल्ला गाठून पोहरा-चिरोडी राखीव जंगलात येऊन ‘सिंकदर’ बनलेला वाघ दरदिवशी बिनधास्त मार्गक्रमण करीत आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी वनविभाग सज्ज असला तरी पोलिसांची अतिरिक्त मदत घेतली जात आहे. पोलिसांनी जंगलात गस्त वाढविली असून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.‘सिंकदर’ पोहरा, चिरोडी जंगलात सतत फिरतीवर राहत असून रस्ता ओलांडण्याच्या भीतीने त्याच्या संरक्षणाची जबाबदारी अधिक वाढली आहे. वाघाच्या दराऱ्यामुळे बिबट, हरिण, काळवीट आदी वन्यपशू सैरभैर झाले आहेत. तो केव्हा, कोठे जाईल, याचा नेम नसल्याने वनविभागाने वन्यप्रेमींच्या सहकार्याने त्याचा मागोवा घेण्यासाठी वेळापत्रकच तयार केले आहे. ‘ट्रॅप’ कॅमेऱ्यात वाघ कैद झाल्यामुळे राखीव जंगलात त्याचे अस्तित्व शाबूत ठेवण्यासाठी युद्धस्तरावर त्याचा शोध घेतला जात आहे. जंगलात ट्रॅप कॅमेरे वाढविण्याचा निर्णय उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांनी घेतला असून त्यानुसार महत्त्वाच्या ठिकाणी वाघावर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जंगलात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना तो रस्ता ‘क्रॉस’ करीत असल्याने तो अनेक वाहनचालकांच्या दृष्टीस पडला आहे. ‘सिंकदर’चे लोकेशन मिळविण्यासाठी पदोपदी वनाधिकाऱ्यांची पळापळ होत असल्याने वाघांच्या सुरक्षिततेसाठी फ्रेजरपुरा पोलिसांची मदत घेतली जात आहे. पोहरा, बोडणा, पिंपळखुटा, इंदला, परसोडा, घातखेडा, तपोनेश्वर या भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांची सीआर व्हॅन रात्रंदिवस गस्त करीत असून वाघ, बिबट्याच्या सुरक्षिततेसाठी वनाधिकाऱ्यांना सहकार्य करीत आहे. पोलिसांकडून जंगलात ये-जा करणाऱ्यांची तपासणी होत असल्याने वाघ, बिबट्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरक ठरत आहे. पोलीस आणि वनकर्मचारी संयुक्तपणे पोहरा, चिरोडी जंगलात गस्त करीत असल्यामुळे वाघांबाबत किती काटेकोरपणे सुरक्षितता बाळगली जात आहे, हे लक्षात येते. (प्रतिनिधी)शेतीच्या कुंपणांची तपासणीवन्यपशुंपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतातील कुंपणात वीजप्रवाह सोडला जातो. मात्र पोहरा, चिरोडी जंगलात वाघाचे अस्तित्व सिद्ध झाल्याने शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडू नये, यासाठी वनविभाग सज्ज झाला आहे. उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या आदेशानुसार वडाळीचे वनपरिक्षेत्राधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर यांच्या मार्गदर्शनात वनपाल विनोद कोहळे व त्यांची चमू शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन मार्गदर्शन करीत आहेत. तसेच शेताच्या कुंपणात वीजप्रवाह सोडला आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. ‘सिंकदर’कडून रस्ता क्रॉसिंगची भीतीपोहरा, चिरोडी जंगलात गस्त वनविभागाची सावधगिरी वनविभाग वाघाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस एक करीत आहेत. पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. त्याकरिता पोलीस विभागाला पत्र सुद्धा देण्यात आले होते. त्यानुसार पोहरा, चिरोडी राखीव जंगलात पोलिसांची गस्त सुरु झाली आहे.- हेमंत मीणा, उपवनसंरक्षक, अमरावती
वाघांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची मदत
By admin | Updated: January 24, 2017 00:09 IST