पोलिसांची तारांबळ : दोन ठाण्यांच्या परिसरात पोलीस छावणीचे स्वरुप अमरावती : आगामी सणांच्या दिवसात कायद्या व सुव्यवस्था ठेवताना पोलीस यंत्रणा किती सक्रिय आहे. तसेच पोलीस घटनास्थळी किती तत्परतने पोहोचू शकतात. याचा आढावा घेण्याकरिता सोमवारी दंगा नियंत्रण योजनेतून दोन ठाण्यांच्या परिसरात पोलिसांनी शक्तिप्रदर्शन केले. या मॉकड्रिलमध्ये पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांसह शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांची ताराबंळ उडाली होती. पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांच्या मार्गदर्शनात सोमवारी दंगा नियंत्रण योजनेच्या अनुषंगाने फे्रजरपुरा व कोतवाली ठाण्यांच्या परिसरात शक्ती प्रदर्शन करण्यात आले. दरम्यान दुपारी १२ वाजता यशोदा नगर व जयस्तंभ चौकात दंगा झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दोन्ही ठाण्यात दिली. सूचना मिळताच पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे व बी.के. गावराने यांच्या नेत्तृत्वात सहायक पोलीस आयुक्त, दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, दंगा नियंत्रण पथक, सीआरपीएफ महिला पथक, दोन सीआरओ व्हॅन, अग्निशमन दलाचे वाहन, रुग्णवाहिका, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी असा सर्व पोलीस ताफा १० मिनिटांत दोन्ही घटनास्थळी पोहोचला. पुन्हा नियंत्रण कक्षाच्या माहितीवरून सर्व पोलीस यंत्रणेला अन्य परिसरात पाठविण्यात आल्याने शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. कोतवाली ठाण्यांच्या हद्दीतील गांधी चौक, नमुना, टांगापडाव, इतवारासह काही परिसर तसेच फे्रजरपुरा ठाण्यांच्या हद्दीतील यशोदा नगर, गवळीपुरा, लायब्ररी चौकस कुंभारवाडा, फ्रेजरपुरा, चपराशीपुरा, राहुलनगर, वडाळी, बेनोडा, प्रशांत नगर या परिसरात मॉकड्रिल घेण्यात आला. (प्रतिनिधी)
दंगा नियंत्रण योजनेतून पोलिसांचे शक्तिप्रदर्शन
By admin | Updated: September 15, 2015 00:19 IST