लालफितशाही उघड : वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीर्घ रजेवरअमरावती : तब्बल साडेसहा लाख लोकसंख्येच्या सुरक्षेची जबाबदारी शिरावर असलेल्या पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बेदिली चव्हाट्यावर येऊ लागली आहे. एकाचवेळी तीन पोलीस उपायुक्तांच्या बदली झाल्यानंतर आयुक्तालयाची सर्कस प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू आहे. अर्ध्या डझनापेक्षा अधिक पोलीस निरीक्षक, अधिकारी सुट्यांवर गेल्याने शहर आयुक्तालयाची स्थिती आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय, अशी झाली आहे. मोरेश्वर आत्राम यांची बदली झाली असली तरी ते उपायुक्त म्हणून कायम आहेत. एकाचवेळी अनेक पोलीस निरीक्षक सुटीवर गेल्याने राजापेठ ठाण्याचे सूत्रे सहायक पोलीस निरीक्षकांकडे द्यावे लागतात. गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठांचा वाद सार्वजनिक झाल्याने पोलीस प्रशासनातील ‘लालफित शाही’ उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या प्रमुखांविरुद्ध तर तक्रारींचा खच पडल्याचे पोलीस वर्तुळात उघडपणे बोलले जाते. आर्थिक गुन्हे शाखा व गुन्हे शाखेमधील विळ्या भोपळ्याचे सख्य पाहता दोन्ही निरीक्षक एकाचवेळी सुटीवर गेले आहेत. दोन्ही शाखांसह अन्य काही विभागाची धुरा पीआय म्हस्केंकडे सोपविण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक डी.एम. पाटील यांनी बडनेऱ्यात विनंती बदली मागितल्याचे बोलले जाते. त्याचवेळी आपली बदली होईलच या पूर्वकल्पनेमुळे धास्तावलेल्या एका निरीक्षकाने दुसऱ्या ठाण्यात बदली मागितली आहे. एकंदरीतच गुन्हे शाखेचे डिटेक्शन चांगले असले तरी अधिकाऱ्यांमधील बेबनाव चव्हाट्यावर येऊ लागला आहे.मुख्य आरोपी पळतोच कसा ! अंतर्गत बेबनावामुळे काही आरोपींना धाड टाकण्यापूर्वीच खबर पोहोचविली जाते. फ्रेजरपुरा ठाण्याअंतर्गत पंधरवड्यापूर्वी जुगार अड्यावर धाड टाकली असता काम करणाऱ्या मजुरांना अटक करण्यात आली. त्याचवेळी जुगारअड्डा चालविणारा आरोपी पळाला. उल्लेखनीय हा आरोपी सदानकदा पोलिसांच्या धाडीवेळी नेमका पळून जातो. यात ही मोठे गौडबंगाल असल्याची ओरड आहे.पोलिस आयुक्तांनीही या प्रकाराला आळा घालावा अशी अमरावतीकरांची अपेक्षा आहे. राजापेठ ठाण्यात नियुक्ति असताना एक उपनिरीक्षक ठाणे सोडून कोर्ट मॉनिटरिंग सेल सांभाळत असल्याची गंभीर बाबही उघड झाली आहे. हा अधिकारी यापूर्वी गुन्हे शाखेत असल्याने मुख्यालयाची त्यांची आवड कमी झाली नसल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.
पोलीस आयुक्तालयात आंधळं दळतयं...!
By admin | Updated: May 25, 2016 00:45 IST