वनकर्मचारी अस्वस्थ : रविवार ते बुधवारपर्यंत घडल्या आगीच्या घटना
पोहरा बंदी : पोहरा आणि वडाळी वनवर्तुळात चार दिवस लागोपाठ आगी लागल्याने वनकर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली होती. जंगलात आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर ती भडकण्यापूर्वीच आटोक्यात आणण्यासाठी वनकर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी वनकर्मचाऱ्यांनी निरीक्षण झोपड्या उभारल्या आहेत. वडाळी रेंजमध्ये आगीचा सामना करण्यासाठी तीस ब्लोअर मशीनची सज्जता करण्यात आली आहे. तरीदेखील आगी आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. या रोजच्या आगीमुळे वनपाल, वनरक्षक, वनमजूर, संरक्षण मजूर यांची पूर्ती दमछाक झाली आहे. हिवाळ्यापासून तर आतापर्यंत पोहरा आणि वडाळी या दोन वर्तुळात लागलेल्या आगीने अर्ध्यापर्यंत जंगल खाक झाले आहे.
चार दिवसांपासून लागोपाठ वनकर्मचाऱ्यांना आगीचा सामना करावा लागला. रविवारपासून बुधवारपर्यंत आगीच्या घटना सतत घडल्याने सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर हे घटना स्थळावर पोहोचून आग नियंत्रणात येईपर्यंत घटना स्थळावर तळ ठोकून होते. जेवड, अंजनगाव बारी, उत्तर वडाळी, परसोडा, उत्तर चोर आंबा या पाच बिटांना आगी लागल्याने काही हेक्टर जंगल जळाले. त्यामध्ये वृक्ष, झाडी, झुडपे, पालापाचोळा, गवत जळून खाक झाल्याने संशयिताना ताब्यात घेण्याचे आदेश वनविभागाने दिले आहेत.
चिरोडी वनवर्तुळात दहा हेक्टर जंगल जळून खाक
चिरोडी वर्तुळात येणाऱ्या लालखेड बीट वनखंड क्रमांक ३१५मध्ये रविवार दुपारी १ वाजता लागलेली आग ४ वाजता आटोक्यात आली. या आगीत सुमारे १० हेक्टर जंगल जळून खाक झाले. ती आग विझवताना आधुनिक साहित्य, साधनसामग्रीचा वापर करण्यात आला. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी वर्तुळ अधिकारी एस.एस. अली, वनरक्षक दीपा बेलाह, गोविंद पवार, राजन हिवराळे, आशिष महले, राहुल कैकाळे, अतुल घस्कट, वनमजूर शेख रफीक, विनायक लोणारे आदींनी आग विझविण्यासाठी कामगिरी बजावली.
पान ३ ची लिड