वन महोत्सवाचे औचित्य : जिल्ह्याला १५ लाखांच्या उद्दिष्टांची शक्यताअमरावती : राज्यातील कमी होत जाणारे वृक्षांचे प्रमाण व त्यातून निर्माण होणाऱ्या जागतिक तापमानात वाढ, प्रदूषण यासारख्या समस्या कमी करण्यासाठी राज्यभरात वन महोत्सवाचे औचित्य साधून १ जुलै रोजी या एकाच दिवशी तब्बल दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण व वनविभागाकडून दीड कोटी तर इतर शासकीय विभागाकडून ५० लाख रोपे लागवड करण्याचे प्रस्तावित आहे. याबाबतचे नियोजन करून २० एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल व वनविभागाने दिले आहेत. राज्यातील वनाच्छादित क्षेत्राची वाढ होण्यासाठी विविध वृक्षरोपणाच्या योजना राबविल्या जात आहेत. वनविभाग, सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांची लागवड केली जात असली तरी यामध्ये संस्था, प्रशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी उद्योजक, स्थानिक स्वराज संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्याचे नियोजन आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा तालुका व गावपातळीवर समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांच्या अध्यक्षांनी नियमित बैठका घेऊन योजनेचे नियोजन करायचे आहे. रोपांची उपलब्धता रोपे लागवडीच्या जागा, लागवडीसाठी खड्डे खोदले त्यासाठी लोकसहभागातून उपलब्ध होणाऱ्या निधीची निश्चित करून अहवाल नियमित सादर करावयाच्या सूचना दिल्या आहेत. दोन कोटी वृक्षांच्या उद्दिष्टांपैकी अमरावती जिल्ह्याला १२ ते १५ लाखांचे उद्दिष्ट मिळण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)
जुलैमध्ये होणार दोन कोटी वृक्ष लागवड
By admin | Updated: April 6, 2016 00:12 IST