गणेश देशमुख अमरावतीघरी परतण्यासाठी अंबाने वसतिगृह अधीक्षकांकडे विनंती केली होती, असा उल्लेख असलेला तपोवन बालगृह अधीक्षकांच्या स्वाक्षरीचा अहवाल 'लोकमत'च्या हाती लागला आहे. वसतिगृहातील वास्तव्यादरम्यान फसगत झाली असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर सुमारे महिनाभर तिने घरी जाण्यासाठी तगादा लावला; तथापि तिला घरी परतू दिले नाही. त्यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात आला, असा आरोप अंबाच्या आई-वडिलांचा आहे. अटक आणि निलंबन झालेला तपोवनातील बालगृह अधीक्षक गजानन चुटे याने नागपूर बालकल्याण समितीला लिहिलेल्या पत्रात अंबा घरी जाण्यासाठी इच्छुक असल्याचा उल्लेख आहे. या पत्रात पुढच्या ओळीत तिने दुसरा अर्ज देऊन घरी जाण्याची विनंती रद्द केल्याचेही नमूद करण्यात आले आहे.अंबा दहशतीत, व्हावी चौकशी!आईवडिल असताना मुलगी बालगृहात वास्तव्यास आहे. घरी रहावयाचे नसल्याच्या तिच्याच म्हणण्यानुसारच आम्ही तिला बालगृहात प्रवेश दिला, असे संबंधितांकडून सांगितले जाते.बालकल्याण समितीने घ्यावी दखलअमरावती : अंबा एका षड्यंत्राची बळी आहे. ती फसलेली आहे. तिला घरी परतायचे आहे. आईला बिलगून एकदा ती ढसाढसा रडली होती. मला सोडवा, अशी विनंती तिने केली होती. वसतिगृहाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य कैद आहेत. तिच्या दोन मैत्रिणी भेटायला गेल्या त्यावेळीही तिने मला येथून काढा, अशी कळकळीची विनंती केली होती. त्या मुलींची नोंदही वसतिगृहातील रजिस्टरमध्ये आढळेल. ती पडताळावी. त्या मुलींचे बयाण घ्यावे. अंबा काय म्हणाली, याबाबत त्या बोलतील. आजीला फोन करून तिने भेटीला बोलविले होते. आवडीचे पदार्थ मागविले होते. मला घरी न्या, अशी विनंती केली होती. 'कॉल हिस्टरी'मध्ये तिने फोन केलेला क्रमांक सापडेल. अलीकडेच अंबाचा फोन आला. 'माझ्यावर काय बितते हे मी सांगू शकत नाही' असे वाक्य ती बोलली. 'तुम्ही लढा देत असल्यामुळे माझे आयुष्य धोक्यात आहे. तुम्हालाही धोका आहे. तुम्ही शांत रहा.' अशी विनवणी तिने केली होती, अशी माहिती अंबाच्या आईबाबांनी दिली. त्यांनी या सर्व बाबीच्या वेळोवेळी लेखी तक्रारी, अर्ज, माहिती योग्य त्या अधिकाऱ्यांना दिली आहे. - तर ती का बोलली असती?अंबाला घरी यायचे नसते तर ती हे सारे का बोलली असती? तिने फोन का केले असते? ती आईला बिलगून का रडली असती? असे सवाल उपस्थित करतानाच, तिचा वापर केला जात आहे. १८ वर्षांची होईपर्यंत तिला जणू नजरकैद ठेवायचे आहे. त्यानंतर बालगृहातून ती निघाली की तिला इतर गैरमार्गात गुंतवायचे आहे, असे तिचे आईवडील बेंबीच्या देठापासून सांगतात. तिच्यावर ललित अग्निहोत्रीचा दबाव असल्याने, तो तिला मारहाण करीत असल्याने, कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत असल्याने ती इच्छेविरुद्ध सर्व सहन करीत आहे, असा आक्रोश तिच्या जन्मदात्यांचा आहे. अंबाच्या मातापित्यांचा जो पोटतिडकीचा दावा आहे, त्यापोटी काही पुरावेदेखील उपलब्ध आहेत. त्याची दखल घेऊन बाल कल्याण समितीने स्वतंत्र चौकशी केल्यास अंबाच्या घराबाहेर असण्यामागे काही अपरिहार्यता आहे का, याची खातरजमा केली जाऊ शकेल.
फुलराणीने केली होती घरी परतण्याची विनंती
By admin | Updated: December 27, 2014 00:33 IST