मोहन राऊत - अमरावती२० वर्षांपूर्वी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर गोवारींनी काढलेल्या मोर्चामध्ये ११४ जण लाठीहल्ल्यात ठार झाले होते. परंतु अद्यापही गोवारी समाजाला आदिवासांच्या खऱ्या सवलती मिळाल्या नसल्याने या शहीद कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.गोवारी ही मूळची आदिवासी जमात आहे. १० सप्टेंबर १९५६ रोजी अनुसूचित जमातीत गोवारीऐवजी गोंडगोवारी असा शब्द अंतर्भूत करण्यात आला़ आहे. सर्व गोवारींना २३ एप्रिल १९८५ पर्यंत गोवारींनाही गोंडगोवारी अशी प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली होती. परंतु २४ एप्रिल १९८५ रोजी शासनाने अध्यादेश काढून गोवारींना अनुसूचित जमातींच्या सवलती काढून घेतल्या़ तेव्हापासून हा समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे़ २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर येथे काढलेल्या मोर्चात ११४ निष्पाप गोवारी युवकांचे लाठीहल्ल्यात बळी गेले. परंतु त्यानंतरही गोवारींना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे २० वर्षे उलटूनही गोवारी समाजाला न्याय मिळत नसेल तर शासनाने निदान इच्छामरणाची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी शहीद गोवारींच्या कुटुंबीयांनी केली आहे.
‘त्या’ कुटुंबांना हवीय इच्छामरणाची परवानगी
By admin | Updated: October 26, 2014 22:34 IST