टाळ-मृदुंगाचा गजर : गुरुकृपा समितीची अल्पोहाराची अनोखी परंपरागुरुकुंज मोझरी : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी गोपालकाल्याच्या दिवशी गुरूकुंज आश्रमातील महासमाधीपासून ब्रम्हमुहूर्तावर ध्यानानंतर पालखी पदयात्रेला सुरुवात झाली. ही पालखी पदयात्रा गुरुकुंज-मोझरी-दासटेकडी असा तब्बल ६ कि.मी. चा पल्ला टाळमृदुंगाच्या गजरातील भक्तीमय वातावरणात श्रीगुरुदेवकी जयच्या जयघोषात दरवर्षीप्रमाणे निघाली. या पालखी यात्रेमध्ये अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या महाराष्ट्रातील शेकडो शाखांमधून आपल्या गुरुमाऊलीची पालखी खांद्यावर घेऊन ही पदयात्रा परिक्रमा उत्साहात पार पाडली जाते. यावेळी त्यांच्या एकात्मता, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा फाशीचा प्रसंग त्याचबरोबर अंधश्रद्धा पसरविणारी नरबळी परंपरा विविध आकर्षक देखाव्यातून यावर्षी मोझरीतील तरुणाईच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. त्यासाठी मोझरीवासीयांच्यावतीने गाव वर्गणीचा संकल्पही दरवर्षी नित्याचा असतो. या आकर्षक प्रतिकांना मोझरी ग्रामपंचायतीच्यावतीने प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक वितरित करण्याचा पायंडा मागील पाच वर्षांपासून नियमित सुरू आहे. यावर्षी प्रामुख्याने येथील गुरुकृपा सार्वजनिक उत्सव समितीच्यावतीने तब्बल ११ क्विंटल तांदळापासून २८ गंज मसालेभात अल्पोहाराच्या रुपामध्ये या पालखी पदयात्रा परिक्रमाच्या शेवटी गावाच्या वेशीवर उत्कृष्टरीत्या वितरित करण्यात आला. त्यासाठी आदल्या दिवशीच्या रात्रीपासून या कार्यक्रमाचे नियोजन समितीच्यावतीने करण्यात येते. त्याला परिसरातील युवकांचा मोठा पाठिंबा असून कुठल्याही अनुचित प्रकाराविना हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धरीत्या दरवर्षी पार पाडला जातो. त्याला जोड म्हणून मोझरी गावकऱ्यांच्यावतीने अनेक ठिकाणी चहा, पाण्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन करण्यात येते. भाविक हे राष्ट्रसंतांची पालखी खांद्यावर घेऊन ग्रामप्रदक्षिणा घालतात. सोबतच भक्तीरंगात न्हाऊन निघतात. अशावेळी त्यांचे प्रत्येक ठिकाणी उत्कृष्ट सोयी-सुविधांनी व गुरुमाऊलीच्या आकर्षक प्रतिमा पूजनाने स्वागत करण्याचा पायंडा मोझरीवासीयांनी अनेक वर्षांपासून निरंतर चालविला आहे. पुढेही तो तुमच्या आर्थिक, सामाजिक सहकार्यातून असाच निरंतर चालत राहील, असा मनोदय गुरुकृपा समितीच्यावतीने यावेळी व्यक्त करण्यात आला. (वार्ताहर)
मोझरीवासीयांच्या आदरातिथ्याने भारावले पालखी पदयात्रेकरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 00:15 IST