धारणी : एरवी मेळघाटमधील अतिदुर्गम गावांकडे ढुंकूनही न बघणाऱ्या उमेदवारांना आता अवघ्या १० दिवसांत ४०३ गावांमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधावा लागणार आहे. मेळघाट विधानसभा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या अत्यंत क्रिटिकल आहे. या मतदारसंघात धारणी, चिखलदरा व अचलपूर या तीन तालुक्यांचा समावेश होतो. धारणीत १५२, चिखलदऱ्यात १५७ तर अचलपूर तालुक्यांत ९४ अशी एकूण ४०३ गावे आहेत. आतापर्यंत सर्व उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. १ आॅक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे आहेत. २ आॅक्टोेबरपर्यंत सर्वांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. १३ आॅक्टोबरच्या सायंकाळपर्यंत प्रचाराची मुभा आहे. ३ ते १३ आॅक्टोबर या १० दिवसांत ४०३ गावांना जाऊन भेटी द्यायच्या आहेत. विस्ताराने मोठा मतदारसंघ, त्यात नव्याने झालेल्या राजकीय उलथापालथी यामुळे आतापर्यंत दुहेरी होणाऱ्या लढती आता चौरंगी झाल्या आहेत. त्यामुुळे सर्व उमेदवारांना प्रत्येक गावात जाऊन मतदारांची भेट घेणे गरजेचे झाले आहे. भौगोलिकदृष्ट्या मेळघाट मतदारसंघ अत्यंत गुंतागुंतीचा आहे. मतदारसंंघाचे दुसरे टोक गाठायचे असल्यास भोकरबर्डी ते सलोना-गौलखेडा हा १०० किलोमीटरचा पूर्व पश्चिम तर जारीदा हातरू ते गौलखेडा बाजार हे १२५ किलोमीटरचे अंतर सर्वांसाठी कष्टदायक ठरणार आहे. प्रत्येक गावात प्रचार वाहन पोहोचवायचे म्हटल्यास ४०३ गावांसाठी कमीतकमी ३५० वाहनांची गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत ४ सबळ उमेदवारांची एकूण १२०० ते १५०० वाहने बघायला मिळाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. आता एखादा उमेदवार नव्या निवडणूक चिन्हावर मते मागायला आदिवासींच्या दारी गेल्यास मतदारांची समजूत काढता-काढता नाकीनऊ येतील. या सर्व समस्यांचा सामना गावपातळीवरील सामान्य कार्यकर्त्याला करायचा आहे. याच कार्यकर्त्यांवर आता उमेदवारांची प्रचाराची भिस्त राहणार असल्याने प्रत्येक गावात प्रामाणिक कार्यकर्ता निवडीचे प्रचंड आव्हान उमेदवार व पक्षांसमोर आहे. एकंदरीत ‘बहुत कठिन है..राह मेलघाट की’ असेच म्हणावे लागेल. (तालुका प्रतिनिधी)
मेळघाटचा मार्ग खडतरच!
By admin | Updated: September 29, 2014 22:54 IST