अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकली : क्लासधारकांचे महापालिकेलाच आव्हान अमरावती : महापालिकेच्या राजापेठस्थित बाजार व परवाना विभागाच्या कार्यालयातील मोकळी जागा खाजगी क्लासेसधारकांनी बळकावली आहे. या कार्यालयाच्या आवारात रोज शंभरपेक्षा अधिक दुचाकींची अवैधरित्या पार्किंग केली जाते. या सर्व दुचाकी नजिकच्या क्लासमध्ये येणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या असतात. सरकारी जागेत खुलेआमपणे होणाऱ्या या पार्किंगला कुणाचा वरदहस्त ? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे.राजकमलमार्गे राजापेठ ओलांडल्यानंतर फाटकापलिकडे महापालिकेची सुसज्ज इमारत आहे. या इमारतीतून सर्वाधिक महत्त्वाच्या बाजार व परवाना विभागाचा कार्यभार सांभाळल्या जातो. या कार्यालयाला भलेमोठे आवारही आहे. या कार्यालयात सेवा देणाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्यांची वाहनांच्या पार्किंगसाठी ती मोकळी जागा आहे. मात्र अलिकडे ४ ते ५ महिन्यांपासून शिकवणीवर्गाधारकांनी ही सरकारी जागा कह्यात घेतली आहे. रोज सकाळी ७ वाजतापासून येथे तैनात असलेला सुरक्षागार्डच शेकडो विद्यार्थ्यांच्या दुचाकी बाजार व परवाना विभागाच्या कार्यालयीन आवारात लावून घेतो. दुचाकीची भलीमोठी रांग या सरकारी कार्यालयात अवैधरित्या लागत असल्याने येथे कामानिमित्त येणाऱ्यांना दुचाकी व चारचाकी वाहन नाईलाजास्तव रस्त्यावर उभ्या ठेवाव्या लागतात. बाजार व परवाना विभागाच्या कार्यालयानजिकच्या संकुलामध्ये तीन ते चार विविध अभ्यासक्रमाचे 'क्लास' घेतले जातात. शिकवणी वर्गाला येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या दुचाकी राजरोसपणे आणि भीडमुर्वत न ठेवता येथे ठेवल्या जातात. पार्किंगचा हा गोरखधंदा अव्याहतपणे सुरु आहे. या व अन्य एका विभागातील विशिष्ट अधिकाऱ्याने या पार्किंगला मुकसंमती दिल्याचे सांगण्यात आले.जबाबदारी कुणाची ?पार्किंगबाबत बाजार परवाना विभागातील कर्मचाऱ्याला विचारणा केली असता या गाडया खुप दिवसापासून लागतात, असे उत्तर मिळाले. बाजार व परवाना विभाग आणि शिक्षण विभागाने या पार्किंगची जबाबदारी परस्परांवर ढकलली आहे. त्यामुळे क्लासधारकांच्या स्तरावर संबंधिताशी याबाबत अर्थपूर्ण बोलणी झाली असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही. शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करतो. संबंधिताना वाहने पार्किंग न करण्याबाबत आणि नो पार्किंगचे फलक लावण्याच्या सूचना दिल्या जाईल.- विनायक औगडउपायुक्त मनपाती इमारत आमच्या ताब्यात नाही. जेथे शाळा भरते तो परिसर आमच्या अखत्यारित येतो. पार्किंगबद्दल मला सांगता येणार नाही.- विजय गुल्हानेशिक्षणाधिकारी, मनपाया इमारतीत माझे कार्यालय असले तरी ही इमारत शिक्षणविभागाच्या अखत्यारित येते. पार्किंगबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित केले आहे.- राजेंद्र दिघडेअधीक्षक, बाजार व परवाना विभाग
बाजार परवाना कार्यालयात शिकवणी वर्गांची 'पार्किंग' !
By admin | Updated: July 19, 2016 00:09 IST