रस्त्याची अक्षरश: चाळणी : डांबरीकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष बडनेरा : एमआयडीसीकडून जाणाऱ्या जुना बायपास मार्गाची चाळणी झाल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठिकठिकाणी लंबे पॅचेस मारण्याचे काम सुरू झाले. मात्र हा मार्ग खुपच खराब झाल्याने या संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. एमआयडीसी भागातून जुना बायपास मार्ग गेलेला आहे. बडनेरा शहरासह इतरही ठिकाणाहून याच मार्गाचा वाहनचालक उपयोग घेत असतात. अमरावती शहर व एमआयडीसीत जाणाऱ्या वाहनांची मोठी संख्या आहे. या मार्गावरून जड वाहतूक होत असते. एमआयडीसीतील माल याच मार्गाने इतरत्र जात असते. त्यामुळे हा मार्ग पूर्णपणे उखडला होता. ठिकठिकाणी खड्डे पडले होते. एमआयडीसीत कामानिमित्त जाणाऱ्या असंख्य वाहनाचालकांना याचा मोठा मन:स्ताप सहन करावा लागत होता. अनेकांना या खराब रस्त्यामुळे दुखापातीदेखील झालेल्या आहेत. 'लोकमत'ने या खराब रस्त्याची व्यथा लोकदरबारात मांडल्यावर दहा किलोमीटर अंतरापर्यंतच्या खड्यांवर लंबे पॅचेस मारून वाहनचालकांना बऱ्यापैकी दिलासा दिला आहे. मात्र केवळ पॅचेस न मारता हा संपूर्ण रस्त्याच पुन्हा डांबरीकरणाने निटनेटका करावा अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)
-अखेर जुना बायपासवर मारले ‘पॅचेस’
By admin | Updated: December 25, 2016 00:16 IST