पूर पीडिताने दिला मानवतेचा अनोखा संदेश सुमित हरकुट - चांदूरबाजारचांदूरबाजार : स्वत:ला मिळालेले पूरग्रस्ताचे अनुदान शेजारच्या पूरग्रस्ताला देण्याचा मनाचा मोठेपणा येथील एका पूर पीडिताने दाखविला. मानवता दाखविणारा हा ‘माणसातील देव’ महसूल कर्मचाऱ्यांना पिंपरी पूर्णा येथे आढळला.पूर्णा धरणातील पाणी अचानक सोडल्याने तालुक्यातील अनेक गावांना त्याची झळ पोहोचली. पूर्णा नदीच्या काठावरील पिंप्री पूर्णा येथील अनेक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. पिके वाहून गेली तर अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने घरातील धान्य व अन्य साहित्याचे जबर नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून शासनातर्फे सानुग्रह अनुदानाचे वाटप प्रत्येक गावात जाऊन मंडळ अधिकारी व तलाठ्यांद्वारे करण्यात आले. पिंपरी पूर्णा येथे मंडळ अधिकारी गजेंद्र मानकर व त्यांचे सहयोगी अनुदान वाटप करीत असताना पूरग्रस्त महादेव जानुजी कुरवाडे यांनासुध्दा ६ हजार रूपयांचे अनुदान देण्यात आले. मात्र, महादेव कुरवाडे यांनी अनुदानाची रक्कम शेजारी राहणाऱ्या अहमद खाँ जांबाज खाँ पठाण यांना देण्याची विनंती केली. महादेव कुरवाडे यांनी मंडळ अधिकारी मानकर यांना आपली परिस्थिती चांगली असून अधिक नुकसान झालेले शेजारी अहमदखाँ यांना हे अनुदान देण्यात यावे, असे सांगितले. अहमदखाँ जाबाजखाँ पठाण यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून पुरामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनाचा सानुग्रह अनुदानाची रक्कम त्यांना दिलासा देणारी ठरली. महादेव कुरवाडे यांची मदतही मोलाची ठरली.
स्वत:च्या वाट्याचे अनुदान दिले शेजाऱ्याला
By admin | Updated: August 4, 2014 23:28 IST