पालकमंत्र्यांचा दावा : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५६ वा दिन साजराअमरावती : राज्य दुष्काळाच्या छायेत असले तरी येत्या काळात जलयुक्त शिवार अभियानातून पाणीटंचाईवर कायमस्वरुपी मात करता येईल, असा दावा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी येथे केला. ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५६ व्या दिनाच्या मुख्य समारंभाप्रसंगी बोलत होते.येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शासकीय समारंभात सकाळी ८ वाजता ना. पोटे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण झाले. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायिले. पालकमंत्र्यांनी परेडचे निरीक्षण केले. याप्रसंगी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गीत्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक, पोलीस अधीक्षक लखमी गौतम आदी उपस्थित होते. ना. पोेट म्हणाले, जिल्ह्यातील टंचाई कायम संपुष्टात आणण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या अभियानांतर्गत २५३ गावांमध्ये २२१३२ टीएमसी जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे संरक्षित सिंचनासाठी ३२६२४ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानामुळे गावागावांत सिंचन क्षमता वाढीस लागून पाण्याची समस्या दूर होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना त्यांनी ज्या थोर विभूतींच्या बलिदानातून त्यांच्या अस्सिम त्यागातून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली त्या सर्व शहिदांना थोर विभूतींना अभिवादन केले. प्रवीण पोटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते यावेळी वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार देऊन मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. अमरावती विभागस्तरावर दलित वस्ती विकास व सुधारणा अभियानांतर्गत ग्रामपंचायत सावंगी मोहाडी जि.अकोला, वरुडताफा ता रिसोड, मोझरी ता. तिवसा, पैलपाडा जि. अकोला यांना पाच लाखांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला.
जलयुक्त शिवार अभियानातून टंचाईवर मात
By admin | Updated: May 2, 2016 00:09 IST