लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गत दोन महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे जिल्ह्यात आठ आगारातील २ हजार ४४० कर्मचाऱ्यांपैकी २ हजार १०० कर्मचारी बिनपगारी झाले आहेत. परिणामी संपावर ठाम असलेले हे एसटी कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणे कठीण झाल्याने त्यांच्यावर उसनवारीची वेळ आली आहे.नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिने एसटी कर्मचारी संपावर गेल्याने हाती पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणावर ठाम आहेत. शासनाने मात्र विलीनीकरण करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. शासन एक पाऊल मागे घ्यायला तयार नाही आणि कर्मचारीदेखील विलिनिकरण जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे काम नाही तर दाम मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मुळात एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजे पगार आणि त्यात दोन महिन्यापासून वेतन नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. जिल्ह्यात २४४० एसटी कर्मचारी आहेत. यापैकी २१०० कर्मचारी संपावर असून केवळ ३५० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. ९५ टक्के कर्मचारी संपात सहभागी आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची सेवादेखील पूर्णपणे ठप्प आहे.
राज्य सरकार वाढवतोय रोषएसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण केले जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोष राज्य सरकारवर वाढला आहे. शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याची नाराजी आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, यासाठी आमचा लढा सुरू आहे. ६५ जणांचे प्राण गेले. त्यामुळे सध्या दुखवट्यात कर्मचारी आंदोलन करीत आहेत. वेतन मिळाले नाही तरी चालेल, पण विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहोत. - संजय मालवीय, एसटी कर्मचारी