शेंदोळा खुर्द : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात या राज्यांतील कावळे व बदक या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळले. परंतु, कोंबड्यांवर हा विषाणू आढळला नाही. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्र्यांनीही महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लू आढळला नसल्याचे जाहीर केले. मात्र, समाज माध्यमांवर राज्यातील कोंबड्यांवर बर्ड फ्लू आला आहे. त्यामुळे चिकन खाऊ नका, अशी अफवा वेगाने व्हायरल केली जात आहे. या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय करणारा वर्ग पुन्हा संकटात सापडला आहे.
शासन व प्रशासनाने अशा अफवा पसरविणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा आता हा पोल्ट्री व्यवसाय करणारा वर्ग कोलमडेल, अशी भीती येथील भूषण ठाकरे, रीतेश जवंजाळ, चेतन वडे, हरिश्चंद्र लांजेवार, किरण निस्ताने, मंगेश बायसस्कर, समीर लांडगे, मुंदावणे, घाटोळ या पोल्ट्री व्यावसायिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.