प्रतिसाद : विविध महाविद्यालयांचा सहभागअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयातून निघालेल्या अवयवदानाची जागृती महाफेरी मंगळवारी पार पडली. या महाफेरीत विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अवयव दान महाफेरीच्या जागृती रथाला विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, महापौर चरणजीतकौर नंदा, जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, सुपर स्पेशालिटीचे अधीक्षक श्यामसुंदर निकम आदी उपस्थित होते.यावेळी विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांनी या महाफेरीचे हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली. यामध्ये त्यांनी मंगळवारी राज्यभर राबविण्यात आलेल्या अवयवदान जनजागृती रॅलीची माहिती दिली.ही महाफेरी जिल्हा सामान्य रुग्णालय ते राजकमल चौकामागे सुपर स्पेशालिटीपर्यंत आली. संपूर्ण महाफेरीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘अवयवदान श्रेष्ठ दान’ या घोषणा दिल्यात. विद्यार्थ्यांच्या हातात जनजागृतीचे छापील संदेश होते. जिल्हा शल्य चिकित्सक अरुण राऊत यांनी विद्यार्थ्यांना अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आवाहन केले. यावेळी अमरावती विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक राजेश पिदडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महारॅलीत ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय, महिला महाविद्यालय, बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, युवा शक्ती महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय, इंदिरा बाई मेघे महिला महाविद्यालय, तक्षशिला महिला महाविद्यालय, शारिरीक शिक्षण विभाग हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांनी सहभाग घेतला. दिनेश राऊत, शोभा रोकडे, रिना लहरिया, दास आदी देखील रॅलीत सहभागी होते. (प्रतिनिधी)
अवयवदान जागृती महाफेरी उत्साहात
By admin | Updated: August 31, 2016 00:04 IST